Moeen Ali: इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर मोईन अलीनं पाकिस्तान दौऱ्यासाठी स्वत:ला उपलब्ध असल्याची माहिती दिलीय. पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून मी निवृत्ती मागे घेत असल्याचं मोईन अलीनं म्हटलं आहे. त्याला इंग्लंडच्या नव्या नेतृत्वाखाली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचं आहे, असंही त्यानं म्हटलं आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या कॉमेंट्रीदरम्यान मोईननं यावर भाष्य केलंय. 


मोईन अलीचा कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा विचार
मोईन अलीनं फलंदाजीसह गोलंदाजीनंही क्रिडाविश्वावर छाप सोडलीय. मोईन अलीनं इंग्लंडसाठी 64 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 195 विकेट्स आणि 2 हजार 914 धावा केल्या आहेत. मोईन अलीने कसोटीतून निवृत्ती मागे घेण्याचं श्रेय इंग्लंड संघाचा नवा प्रशिक्षक ब्रेंडम मॅक्युलम यांना दिलंय. मॅक्युलमनं काही दिवसांपूर्वी कसोटी निवृत्ती मागे घेण्याबाबत मोईन अलीशी चर्चा केली होती. त्यावेळी मॅक्युलमनं मोईन अलीला कसोटीमध्ये खेळायचं आहे का? असं विचारलं होतं. त्यानंतर मोईन अलीनं कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा विचार केला. 


मॅक्युलमची मोईन अलीला खुली ऑफर
आयपीएलमध्ये मोईन अली मॅक्युलमसोबत खेळला आहे. यावर मोईन अली म्हणाला की, "मी मॅक्युलमसोबत आयपीएलमध्ये क्रिकेट खेळलो आहे. ज्या पद्धतीनं त्याचं काम आहे, त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळायला चांगलं वाटतं. मॅक्युलमनंच मला तुझ्यासाठी दरवाजे उघडे असल्याचं सांगितलंय." 


पाकिस्तानच्या धर्तीवर इंग्लंडकडून खेळण्याचं मोईन अलीचं स्वप्न
पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी क्रिकेट खेळणे हे त्याचं स्वप्न असल्याचे मोईन अलीचे म्हणणं आहे. "मी पाकिस्तानमध्ये पीएसएल खेळलो आहे. पण इंग्लंडकडून पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी क्रिकेट खेळणं, हे माझं नेहमीच स्वप्न राहिलं आहे." इंग्लंड संघाची कमान आता बेन स्टोक्सच्या हातात आहे, तर मॅक्युलमकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी आली आहे.


हे देखील वाचा-