MCA Election 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अर्थात एमसीएच्या अध्यक्षपदासाठीची निवडणुकीची चर्चा सर्वत्रच झाली. यावेळी अध्यक्ष पदासाठी माजी क्रिकेटर संदीप पाटील (Sandeep Patil) आणि अमोल काळे (Amol Kale) अशी दोन नावं होती. यातील संदीप यांना अवघं क्रिकेटजग ओळखतं पण दुसरं नाव अमोल काळे कोण हा प्रश्न सर्वांसमोर होता...विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच संजय राऊत यांनी महाआयटी घोटाळ्याचे आरोप केलेले अमोल काळे हेच का? असा प्रश्नही अनेकांना पडला असून हो हे तेच अमोल काळे आहेत, ज्यांना देवेंद्र फडणवीस यांचा निकवर्तीय म्हणूनही ओळखलं जातं. 


तर अमोल काळे हे मूळचे नागपूरकर असून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राहिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात तसंच मुंबई क्रिकेट जगतात मागील काही वर्षांत समोर आलेलं हे नाव नेमकं कोण? याबद्दल अनेकांना माहिती नाही. पण आता एमसीए अध्यक्षपदासाठी ते उमेदवार झाले आणि सर्वत्र त्यांची चर्चा सुरु झाली. तर अमोल काळेंबद्दल आतापर्यंत समोर आलेल्या माहितीचा विचार करता ते नागपूरमध्येच लहानपणापासून असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बालपणापासून ओळखतात. नागपूर विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं असून ते बांधकाम आणि आयटी क्षेत्रात व्यवसाय करत असल्याची चर्चाही आहे. विशेष म्हणजे ते फडणवीस यांचे  निकटवर्तीय असल्याचं आतापर्यंत अनेकदा समोर आलं आहे. 2019 मध्ये फडणवीसांच्या शिफारसीनंतरच मुंबई क्रिकेट असोसिएशच्या निवडणूकीत अमोल काळे यांना बाळ महाडदळकर या तगड्या गटाकडून उमेदवारी मिळाली आणि ते उपाध्यक्ष म्हणून निवडूनही आले. तसंच फडणवीसांमुळेच ते 2019 मध्ये त्यांची तिरुमाला तिरुपती देवस्थानावर विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक झाल्याचंही अनेकांनी म्हटलं.


त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आलं आणि अमोल काळे हे नाव अधिकदा चर्चेत आलं नाही. पण काही महिन्यांपूर्वी संजय राऊत यांनी  महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा अमोल काळेने केला असे आरोप केले. महाआयटीमध्ये हा घोटाळा झाल्याचं राऊत म्हणाले, कोणत्याही टेंडरशिवाय कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्याचे आरोपही राऊतांनी केले होते. ज्यानंतर अमोल काळे कोण? ही चर्चा सुरु झाली होती. त्यादरम्यान काळे यांनी राऊतांचे आरोप फेटाळले होते. विशेष म्हणजे आता आता एमसीए निवडणुकीतून आशिष शेलार यांनी माघार घेतल्यानंतर अमोल काळेंना अध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलं असून ज्या पॅनलकडून काळे उभे आहेत, त्यामध्ये शिवसेनेपासून ते राष्ट्रवादी आणि सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. दरम्यान सर्वपक्षीय पॅनलकडून अध्यक्षपदासाठी आलेले अमोल काळे नक्की कोण? यामुळे हे नाव आता पुन्हा चर्चेत आलं आहे.  


राजकीय वरदहस्त नाही तर माझ्या कतृत्त्वावर मी इथवर आलो आहे : अमोल काळे


या सर्व चर्चानंतर अमोल काळे यांच्या एबीपी माझाने संपर्क साधला असता त्यांनी 'माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त नाही. मी कतृत्त्वावर इथवर आलो आहे' असं वक्तव्य केलं.  अमोल काळे यांना राजकीय संबंधामुळे ही संधी मिळाल्याची टीका झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ''मी देवेंद्र फडणवीस यांचा मित्रा आहे म्हणून माझ्यासंदर्भात असं बोललं जातं. पण मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर एमसीए निवडणूक लढवत आहे. माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त आहे हे आरोप चुकीचे आहेत. तसंच माझा एमसीएशी काही संबंध नाही असं म्हणन चूकीचं आहे. तसंच ''मी जवळपास 7 वर्ष एमसीएमध्ये काम करतोय. मला मुंबई क्रिकेटसाठी भरपूर काही करायचं आहे यासाठीच मी निवडणूक लढतोय.''असंही अमोल काळे म्हणाले.