Mumbai Cricket Association Election 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुकीचे (Mumbai Cricket Association Election) निकाल समोर आले असून पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे (Amol Kale) एमसीएचे नवे अध्यक्ष झाले आहेत. माजी कसोटीवीर संदीप पाटील (Sandeep patil) पराभूत झाले आहेत. यावेळी अमोल काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना 158 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीसाठी 300 हून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे राजकारणी एकाच मंचावर आले होते.


या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांचं पॅनल एकत्र निवडणूक लढवल्यानंतर त्यांचे उमेदवार अमोल काळे विजयी झाले आहेत. अमोल काळे निवडून आल्यानंतर त्यांनी सर्व पॅनेलचे आभार मानले. आशिष शेलार यांचं नाव त्यांनी आवर्जून घेतलं. तसंच उपस्थित कार्यकर्त्यांनी काळे निवडून आल्यानंतर त्याठिकाणी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.


विजयी उमेदवार


पवार-शेलार पॅनलचे उमेदवार अमोल काळे निवडून आले असून त्यांना 183 मतं मिळाली दुसरीकडे संदीप पाटील यांना मात्र 158 मतं मिळाल्याने ते थोडक्यात पराभूत झाले आहेत. याशिवाय सचिव म्हणून अजिंक्य नाईक 286 मतांनी निवडून आले असून मयांक खांडवाला (35) आणि नील सावंत (20) यांना त्यांनी मागे टाकलं आहे. खजिनदार म्हणून अरमान मलिक 162 मतांनी आघाडीवर असून जगदीश आचरेकर यांना 161 मतं मिळाली आहेत. पण केवळ एका मताचा फरक असल्याने पुनर्मोजणी होणार आहे. तर गणेश अय्यर 213 मतांसह कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आले असून मलिक मर्चंट (123) यांना त्यांनी मात दिली आहे. निवडून आलेल्या उमेदवारांची अपेक्स बॉडी पुढील प्रमाणे-



  • मिलिंद नार्वेकर 

  • नीलेश भोसले

  • अभय हडप

  • समद सूरज

  • जितेन्द्र आव्हाड

  • मंगेश साटम

  • संदीप विचारे

  • प्रमोद यादव


कोण आहेत अमोल काळे?


अमोल काळे हे मूळचे नागपूरकर असून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राहिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात तसंच मुंबई क्रिकेट जगतात मागील काही वर्षांत त्यांचं नाव सातत्यानं समोर येत होतं. आता एमसीए अध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांनी माघार घेतल्यावर अमोल काळे नवे उमेदवार म्हणून समोर आले. त्यानंतर त्यांची चर्चा सुरु झाली. अमोल काळेंबद्दल आतापर्यंत समोर आलेल्या माहितीचा विचार करता ते नागपूरमध्येच लहानपणापासून असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बालपणापासून ओळखतात. नागपूर विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं असून ते बांधकाम आणि आयटी क्षेत्रात व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशच्या निवडणूकीत अमोल काळे यांना बाळ महाडदळकर या तगड्या गटाकडून उमेदवारी मिळाली आणि ते उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते.


मुंबई क्रिकेट असोसिएशनबाबत महत्वाची माहिती


मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएला पूर्वी बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणून ओळखलं जायचं. ही मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे आणि नवी मुंबईसारख्या क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. एमसीएच्या कार्यक्षेत्रात पश्चिम उपनगरामधील डहाणू, मध्य उपनगरातील बदलापूर आणि खारघर तसेच नवी मुंबईचा समावेश आहे.



 


हे देखील वाचा-


MCA Election 2022 : पवार-शेलार पॅनलकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेले अमोल काळे आहेत तरी कोण?