India Test Ranking : नागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला होता. या विजयासह टीम इंडियाने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. आयसीसीनं जारी केलेल्या ताज्या क्रमवारीत टीम इंडिया 115 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहचली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे 111 गुण आहेत. टीम इंडिया सध्या टी 20, वन डे आणि कसोटीमध्ये अव्वल स्थानावर पोहचली आहे. आयसीसीने ट्वीट करत भारतीय संघाचं अभिनंदन केले आहे. त्याशिवाय सोशल मीडियावरही चाहत्यांकडून टीम इंडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


बॉर्डर गावस्कर मालिकेला सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होता. तर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर होता. पण नागपुरात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं एकतर्फी विजय मिळवला. त्याचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. ताज्या क्रमवारीनुसार, भारतीय संघ टी 20, वनडे आणि कसोटीमध्ये पहिल्या स्थानावर पोहचला आहे. 


भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये एकाच वेळी पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. नागपूर कसोटीपूर्वी 126 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर होता. पण दारुण पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ 111 गुणांवर घसरला आहे. तर टीम इंडिया पहिल्या स्थानावर पोहचली आहे. त्याशिवाय कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचण्याच्या दिशेने भारतीय संघानं एक पाऊल पुढे टाकले आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेतील उर्वरीत तीन सामन्यापैकी भारतीय संघाने दोन सामन्यात विजय मिळवल्यास कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला पोहचणार आहे. असं झाल्यास टीम इंडिया लागोपाठ दुसऱ्यांदा ही कामगिरी करणार आहे.  


अश्विनही कसोटीत दुसऱ्या क्रमांकावर 


आर. अश्विन आणि रविंद्र जाडेजा या फिरकी जोडीच्या जाळ्यात कांगारु अडकले होते. रविंद्र जाडेजाने पहिल्या डावात तर अश्विन याने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या होत्या. या फिरकी जोडीनं दोन्ही डावात 15 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. आता आयसीसीने जारी केलेल्या ताज्या क्रमावारीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. 846 गुणांसह अश्विन चौथ्या क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानावर पोहचलाय. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमात फक्त 21 गुणांचा फरक आहे. 


 






आणखी वाचा :
Cheteshwar Pujara : दिल्लीमध्ये चेतेश्वर पुजारा खेळणार 100 वा कसोटी सामना, वाचा त्याची कारकिर्द आणि खास रेकॉर्ड्स