भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर, केएल राहुल फिटनेस टेस्टमध्ये पास, श्रीलंकेला रवाना होणार
Asia Cup 2023 : नेपाळ आणि भारत यांच्यात सामना सुरु असतानाच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
KL Rahul, Asia Cup 2023 : नेपाळ आणि भारत यांच्यात सामना सुरु असतानाच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केएल राहुल याने फिटनेस चाचणी पास केली आहे. केएल राहुल मंगळवारी श्रीलंकेत दाखल पोहचणार असून भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. टीम इंडियाच्या सुपर 4 मधील सामन्यासाठी राहुल उपलब्ध असेल.
दुखापतीमुळे केएल राहुल आशिया चषखातील पहिल्या दोन सामन्याला उपलब्ध नव्हता. बेंगलोर येथे एनसीएमध्ये केएल राहुल याने फिटनेसवर काम केले. आज केएल राहुलने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली. राहुल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. विश्वचषकासाठी राहुल उपल्बध असेल. त्याची निवडही निश्चित मानली जात आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यात खेळू शकतो केएल राहुल
भारतीय संघाने नेपाळविरोधात विजय मिळवला तर भारतीय संघ आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीत प्रवेश करेल. अ गटामध्ये पाकिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने सामना जिंकल्यास दुसऱ्या क्रमांकावर असेल. 10 सप्टेंबर रोजी ग्रुप अ मधील आघाडीच्या दोन्ही संघामध्ये सामना होईल... भारताने सामना जिंकल्यास रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात केएल राहुल कमबॅक करु शकतो. 2 सप्टेंबर रोजी झालेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता.
मंगळवारी विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड होणार -
5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नई येथे रंगणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 15 जणांच्या संघात कुणाला संधी मिळणार... हे जवळपास निश्चित झालेय. विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या संघामध्ये आशिया चषकात खेळत असलेल्या खेळाडूंचीच निवड होणार आहे. रोहित शर्माकडे संघाची धुरा असेल. त्याशिवाय विराट कोहली, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, ईशान किशन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांची नावे निश्चित आहे.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समिती काही आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकते. पण रिपोर्ट्सनुसार, आशिया चषकात खेळणाऱ्या संघातीलच खेळाडू निश्चित झाले आहे. बीसीसीआय विश्वचषकासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करणार आहे. संघ निवडीसाठी पाच सप्टेंबर अखेरची तारीख आहे. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे, केएल राहुल फिट झालाय. एनसीएमधील मेडिकल टीमने केएल राहुल तंदुरुस्त झाल्याचे जाहीर केले आहे.