KL Rahul On Hardik Pandya : रविवारी, इंग्लंडविरोधात इकाना स्टेडिअममध्ये हार्दिक पांड्या भारतीय संघात परतणार का? असा सवाल अनेक चाहत्यांना पडला असेल. याबाबत विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याने अपडेट दिलेय. इंग्लंडविरोधातील सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत राहुलने हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली. इंग्लंडविरोधात हार्दिक पांड्या खेळणार नसल्याचे केएल राहुल याने सांगितले. हार्दिक पंड्याला सक्तीच्या विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. विश्वचषकात महत्वाच्या सामन्यात हार्दिक पांड्या भारतीय संघाचा भाग असेल. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव प्लेईंग 11 चा भाग असेल. लखनौमधील इकाना स्टेडिअमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असल्याचेही केएल राहुल याने सांगितले.
काय म्हणाला केएल राहुल ?
भारत-इंग्लंड सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत केएल राहुल म्हणाला की, आज मी मैदानावर वॉर्म अप केले. थोडा धावलोही. पण यानंतर ट्रेनर रजनी सरांना सांगितले मला धडधड होतेय. मागील वेळी या मैदानातील माझा अनुभव फारसा चांगला नव्हता, मी दुखापतीचा बळी ठरलो. तो काळ माझ्या करिअरमधील सर्वात कठीण काळ होता. त्यानंतर चुकांमधून शिकून कमबॅक केलेय. पुन्हा एकदा इकाना स्टेडिअमध्ये खेळण्यास तयार आहे.
कधी होणार सामना -
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना लखनौच्या इकाना स्टेडिअममध्ये रविवारी 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल.
हार्दिक पांड्या दोन सामन्याला उपलब्ध नाही -
भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळं त्याला न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही खेळता येणार नाही. हार्दिक पंड्याला दुखापतीच्या कारणास्तव न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. पुण्यातल्या भारत-बांगलादेश सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर चेंडू अडवताना त्याचा पाय मुरगळला होता. त्यामुळं हार्दिक पंड्याला सक्तीच्या विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. हार्दिक सध्या पंड्या पूर्ण विश्रांती घेऊन, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात सामील होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण या सामन्यासाठीही हार्दिक पांड्या उपलब्ध नाही. हार्दिक पांड्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्याविरोधात खेळणार नाही. तो दक्षिण आफ्रिकाविरोधात पाच नोव्हेंबर रोजीच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, असे वृत्त आहे.