Kiran Navgire Profile : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंडमध्ये तीन टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. महिला टी 20 चॅलेंजमध्ये (Women’s T20 Challenge) शानदार कामगिरी करणाऱ्या किरण नवगिरे (Kiran Navgire) हिची इंग्लंड दौऱ्यांची ट्वेण्टी 20 संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. महिला टी20 चॅलेंजमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या किरण नवगिरेची पहिल्यांदाच भारतीय टी20 संघात समावेश झाला आहे. पत्र्याच्या दोन खोल्यात राहणारी खेड्यातील किरण नवगिरेने परिस्थितीवर मात करुन मिरे ते इंग्लंड असा स्फूर्तिदायक प्रवास केला आहे. महिला क्रिकेटचा विश्वकप जिंकण्याचा तिचा मानस आहे. 


महिला विश्वचषक जिंकण्याचं किरण नवगिरेचं स्वप्न 
किरण नवगिरेचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूरच्या मिरे गावात झाला आहे. मिरे हे माळशिरस तालुक्यातील हजारभर लोकवस्ती असलेलं छोटेसं गाव आहे. या गावात दोन पत्र्यांच्या खोलीत राहणारी किरण नवगिरे ही आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर मिरे ते इंग्लंड असा एक प्रेरणादायी प्रवास करणार आहे. महिला क्रिकेटमधील प्रतिधोनी असं ओळख मिळवलेल्या या खेड्याच्या मुलीची भारतीय महिला क्रिकेट टी20 संघात निवड झाली आहे. हुकुमी सिक्स हिटर अशी ओळख तयार केलेली किरण सध्या नागालँड संघाकडून खेळत होती. अतिशय नियोजनबद्ध रितीने आपण आपलं ध्येय गाठत असल्याचं तिने सांगितलं. ठरवल्याप्रमाणे सुरुवात केल्यापासून पाचव्या वर्षी किरण भारतीय महिला संघात दाखल झाली आहे. या इंग्लंड दौऱ्यात तीन टी20 सामन्यासाठी तिची निवड करण्यात आली असून या दौऱ्यात आपल्या बॅटची कमल तिला इंग्लंडमध्ये दाखवायची आहे. आजवर महिला क्रिकेट संघाला न मिळवता आलेला विश्वकप जिंकणं हे किरणचं स्वप्न असून त्यासाठी ती कसून मेहनत घेत आहे. 


'तेव्हा वडील म्हणायचे मेडल आण'
घरात गरिबी असूनही केवळ वडिलांच्या पाठिंब्यामुळे किरणने विविध खेळात शेकडो मेडल मिळवली आहेत. तिचे छोटेसे पत्र्याचे घर तिच्या कप आणि पदकांनी भरुन गेलं आहे. वडिलांना काय आणू असे विचारल्यावर वडील नेहमीच मेडल आण, असं सांगायचे. मजुरी करुन किरणच्या वडिलांनी दोन एकर जमीन घेतली आणि कुटुंब या जमिनीत राबत असते. किरणने स्वयंपाक शिकावा, धुणीभांडी करावीत म्हणून तिने आईचा अनेक वेळा मार खाल्ला आहे. पण किरणची भारतीय संघात निवड झाल्यावर आपला आग्रह चुकीचा होता असं आईला वाटतं. 


किरणच्या कामगिरीकडे लक्ष
आज किरण थेट भारतीय संघात सामील झाल्याने माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्यात सध्या किरण नवगिरे हिचीच चर्चा सुरु आहे. आपल्याला धोनीसारखे सिक्स मारायला आवडतात, असं म्हणणाऱ्या किरणने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. येत्या 10 सप्टेंबरपासून महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा सुरु होत असून सर्वांचेच लक्ष या लेडी धोनी उर्फ किरण नवगिरे हिच्या कामगिरीकडे असणार आहे.