Joe Root Steps Down: इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. जो रूटच्या या निर्णयामुळं इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. जो रूटच्या नेतृत्वात इंग्लंडच्या संघाला शेवटच्या 17 सामन्यापैकी एकच विजय मिळवता आला आहे. ज्यामुळं त्याच्या कर्णधारपदाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. महत्वाचं म्हणजे, जो रूटनंतर कोणत्या खेळाडूकडं इंग्लंडच्या कसोटी संघाची जबाबदारी देण्यात येईल? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. 

जो रूट काय म्हणाला?“कॅरेबियन दौऱ्यावरून परतल्यानंतर आणि विचार करायला वेळ मिळाल्यानंतर मी इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात आव्हानात्मक निर्णय होता.परंतु, माझ्या कुटुंबाशी आणि माझ्या जवळच्या लोकांशी याबद्दल चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. कसोटी संघाचं कर्णधारपद सोडणं माझ्यासाठी योग्य वेळ आहे. मला देशाचं कर्णधारपद मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे", असं जो रूटनं म्हटलं आहे. तसेच कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतरही जो रूट आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणार आहे. इंग्लंडचा पुढचा कर्णधार, माझे सहकारी प्रशिक्षक यांना शक्य होईल, त्या मार्गानं मदत करेन, असंही रूट म्हणाला आहे. 

जो रूटच्या नेतृत्वात इंग्लंडची कामगिरीदरम्यान, अॅलिस्टर कुकनंतर 2017 मध्ये जो रूटची इंग्लंडचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली  इंग्लडनं 2018 मध्ये मायदेशात भारताला 4-1 पराभूत केलं. त्यानंतर 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर 3-1 असा विजय मिळविला. तसेच 2001 नंतर 2018 मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला इंग्लंडचा कसोटी कर्णधार ठरला होता. त्यानंतर 2021 मध्ये श्रीलंकेवर 2-0 असा विजय मिळवून त्यानं पराक्रमाची पुनरावृत्ती केली. जो रूटनं 2012 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानं आतापर्यंत 117 सामने खेळले आहेत. ज्यात 51.3 च्या सरासरीनं त्यानं 9 हजार 889 धावा केल्या आहेत. यापैकी 64 सामन्यात त्यानं इग्लंडच्या संघाचं नेतृत्व संभाळलं. यातील 27 सामन्यात इंग्लंडनं विजय मिळवला आहे. तर, 26 सामन्यात पराभव स्वीकारला होता.

हे देखील वाचा-