RR vs GT IPL 2022: आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये दोन महत्त्वाच्या संघात सामना होणार आहे. आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या संघात कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. कारण दोन्ही संघांनी चार सामन्यांपैकी तीन विजय मिळवले आहेत. तर एका सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे या दोन्ही संघापैकी विजयी संघ गुणतालिकेत अग्रेसर राहणार आहे.


या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत राजस्थानचा रॉयल्सच्या एकच पराभव झाला आहे. राजस्थानचा पराभव रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने केला आहे. तर गुजरात टायटन्सनचा एकमेव पराभव हा हैदराबादने केला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ तगडे आहेत. आज सायंकाळी साडेसात वाजता हा सामना होणार आहे.


दरम्यान, राजस्थानच्या संघाकडून फलंदाजीची धुरा जोस बटलरवर याच्यावर असणार आहे. तर शिम्रॉन हेटमायर हा देखील चांगली खेळी करताना दिसत आहे. देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार संजू सॅमसन हे दोघे सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहेत. राजस्थानकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलवर राजस्थानच्या फिरकीची मदार असणार  आहे. तर रविचंद्रन अश्विनची त्याला पुरेशी साथ मिळत आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट प्रतिस्पर्धी संघांसाठी घातक ठरत आहेत.


तर गुजरातच्या फलंदाजीची भिस्त शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्यावर आहे. मॅथ्यू वेड धावांसाठी झगडत आहे. तर डेव्हिड मिलरचा खेळही अपेक्षेनुसार उंचावलेला नाही. अभिनव मनोहर आणि बी. साई सुदर्शन यांनी जबाबदारीने खेळ करण्याची गरज आहे. राहुल तेवतिया देखील चांगली खेळी करत आहे. सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक गणला जाणारा लॉकी फग्र्युसन, मोहम्मद शमी असा वेगवान गोलंदाज गुजरातकडे आहेत. फिरकी गोलंदाज रशीद खान हा त्यांचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. 


दरम्यान, दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू आहेत. विशेष म्हणजे या संघामध्ये चांगला समतोल असल्याचे पाहायला मिळत आहे. या संघांनी आत्तापर्यंत चांगली कामगिरी केल्यामुळे आज होणारी लढत चुरशीची होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.