T20 World Cup 2024 : भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant)  आगामी टी 20 विश्वचषकात खेळताना दिसू शकतो. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पंतच्या खेळण्याबाबत संकेत दिले आहेत. दरम्यान, ऋषभ पंत आयपीएलसाठी सज्ज झाला असून तो दिल्लीकडून खेळताना दिसेल.


जून 2024 मध्ये होणारा टी 20 विश्वचषक यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडणार आहे. दोन जूनपासून विश्वचषकाच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकात ऋषभ पंत खेळताना दिसू शकतो. पंत भारताकडून नोव्हेंबर 2022 मध्ये अखेरचा खेळताना दिसला होता. डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंत याच्या कारचा भीषण अपघात झाला होता, त्यामध्ये तो गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून मैदानावर परतण्यास सज्ज झालाय. तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याशिवाय तो विश्वचषकातही खेळू शकतो. जय शाह यांनी ऋषभ पंत याच्याबाबात महत्वाचे अपडेट दिले आहेत. दरम्यान, ऋषभ पंत दिल्लीच्या संघाची धुरा संभाळताना दिसणार आहे. पण तो विकेटकिपिंग करणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


 जय शाह यांनी दिले स्पष्ट संकेत - 


बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आज पीटीआयला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी ऋषभ पंत आणि मोहम्मद शामी यांच्याबद्दल महत्वाचं अपडेट दिले. ते म्हणाले की, "ऋषभ पंत सध्या चांगली फलंदाजी करत आहे. त्याची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. लवकरच ऋषभ पंत याला तंदुरुस्त म्हणून एनसीएकडून जाहीर करण्यात येईल. जर ऋषभ पंत टी 20 विश्वचषकात खेळला तर भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरेल. ऋषभ पंत टीम इंडियासाठी हुकमी एक्का आहे. ऋषभ पंत तंदुरुस्त राहिला तर विश्वचषकात खेळेल. तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो, याकडेही नजरा असतील." दरम्यान, मोहम्मद शामी अद्याप तंदुरुस्त नाही. तो आपल्या फिटनेसवर काम करत आहे. तो विश्वचषकात खेळू शकत नाही. नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरोधात तो मैदानात कमबॅक करेल, असेही जय शाह यांनी सांगितलं. 






जय शाह यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, जर ऋषभ पंत यानं आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली. तर त्याला विश्वचषकासाठी टीम इंडियात स्थान मिळू शकते. ऋषभ पंत याची निवड झाली तर जितेश शर्मा अथवा इशान किशन यांच्यापैकी एकाचा पत्ता कट होऊ शकतो.