Mumbai Indians Jersey : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्याआधी प्रत्येक संघांनं जोरदर तयारी सुरु केली आहे.  हैदराबाद आणि राजस्थान संघानंतर मुंबई इंडियन्सनेही आपली जर्सी रिलीज केली आहे. आयपीएल 2024 आधी कर्णधार बदल्यानंतर आता मुंबई इंडियन्सने जर्सीही बदलली आहे. त्यामुळे नव्या जर्सीत काय बदल आहेत, याची उत्सुकता सर्वांनाच लागली. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत आपली जर्सी लाँच केली. मुंबईची ही जर्सी प्रसिद्ध डिझायनर मोनिषा जयसिंह यांनी डिझाईन केली आहे. मुंबई इंडियन्सच्या जुन्या जर्सीप्रमाणेच नव्या जर्सीच रंग निळा आहे. तर निळ्या रंगाच्या जर्सीवर खांद्याच्या बाजूला सोनेरी पट्टे आहेत. त्यामुळे जर्सी तशीच तर आहे हा प्रश्न सर्वाना पडेल. मग नवीन काय बदल केला आहे? असा प्रतिप्रश्नही समोर येईल. फक्त एम हे अक्षर संपूर्ण जर्सीमध्ये तुम्हाला दिसून येत आहे.  






मुंबईच्य जर्सीमध्ये काय खास ? 


मुंबई इंडियन्सच्या खास ब्लू अँड गोल्ड या दोन्ही रंगांची उधळण असलेल्या या जर्सीची निर्मिती जयसिंह यांनी डिझाईन केली आहे. जर्सीवर एम हे आद्याक्षर आर्ट डेको स्वरूपात ग्रिड पद्धतीमध्ये कोरण्यात आले आहे. रॉयल ब्लू रंगाच्या शेड्सच्या पातळ आणि जाड रेषांनी पॅटर्न तयार केला गेला आहे. अत्यंत अचूक आणि नीटनेटकी भौमितिय रचना यात दिसते. रॉयल ब्लू हा रंग आत्मविश्वास आणि ताकदीची ओळख आहे. पण जयसिंह यांनी करूणा आणि आपसातील अवलंबित्व दर्शवण्यासाठी इम्पिरियल ब्लू रंगाचा वापर केला आहे. या सर्व भावना मुंबई इंडियन्स आणि  चाहत्यांसाठी खऱ्या ठरतात. त्यासोबत जर्सीच्या दोन्ही बाजूंना रेसिंग ग्राफिकच्या माध्यमातून गोल्ड रंगाची पट्टी देण्यात आली आहे. तिचा अर्थ सूर्याची ऊर्जा आणि शक्ती असा आहे. 



जर्सीच्या अनावरणाबाबत बोलताना मुंबई इंडियन्सचे प्रवक्ते म्हणाले की, “आमचे खेळाडू ब्लू आणि गोल्ड जर्सीचे रंग परिधान करतात तेव्हा एमआय पलटनच्या आशा आणि स्वप्नेदेखील परिधान करतात. त्याला मुंबई मेरी जानच्या ऊर्जेने भारून टाकलेले असते. ही जर्सी गौरवाचे प्रतीक आहे, परिधान करणाऱ्या सर्वांसाठी तो एक अभिमान आहे कारण ते आपल्यासोबत या टीमचा एक प्रतिभाशाली वारसा सोबत नेत असतात आणि टीमप्रति प्रेम दाखवत असतात.”


डिझायनर मोनिषा जयसिंह म्हणाल्या की, “मुंबई आणि एमआयची ऊर्जा कायमच बळकट असते आणि त्यात तिच्या आवडत्या टीमला आणि चाहत्यांना आकर्षित करणारी अथांग शक्ती, वैविध्यपूर्णता, आशावाद, हृदय आणि मेहनत या सर्व गोष्टींचा समावेश आहे. मी याच गोष्टीला या डिझाइनमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मला खेळाडू आणि चाहते या दोघांनाही प्रेरित करायचे होते कारण मुंबईचे आणि मुंबई इंडियन्सचे काळीज त्यात वसलेले आहे.”