Ishan Kishan Record: भारताचा सलामी फलंदाज ईशान किशन सध्या दमदार फॉर्मात आहे.  वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनने अर्धशतक झळकावले. ईशान किशनने 64 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. ईशान किशनचे हे सलग चौथे अर्धशतक आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ईशान किशनने अर्धशतक ठोकले होते. त्यानंतर तिन्ही एकदिवसीय सामन्यात अर्धशतके ठोकली आहेत.  यासह धोनीच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे.


विडिंज दौऱ्यात ईशान किशन तुफान फॉर्मात आहे. ईशान किशन ज्या लयीत फलंदाजी करत आहे, त्यामुळे विश्वचषकासाठी दावा मजबूत केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 वनडे मालिकेत ईशान किशन याने अर्धशतक ठोकली आहेत.  पहिल्या सामन्यात ईशान किशनने 46 चेंडूत 52 धावांची खेळी केली. यानंतर दुसऱ्या सामन्यात  ५५ चेंडूत ५५ धावा केल्या. त्याचबरोबर आता मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा अर्धशतक ठोकले.  






ईशान किशनचा अनोखा रेकॉर्ड -


ईशान किशनने वेस्ट इंडिजच्या भूमीवर लागोपाठ 3 वनडेत 3 अर्धशतके झळकावून इतिहास रचला आहे.  वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इशान किशनने 34 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली होती. इशान किशनने या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार लगावले होते.  वनडे मालिकेत तिन्ही सामन्यात ईशान किशन याने सलग तीन अर्धशतके ठोकत विक्रम केला. याआधी के श्रीकांत, दीलीप वेंगसकर, एमएस धोनी आणि श्रेयस अय्यर यांनी एकाच मालिकेत सलग तीन अर्धशतके ठोकली आहेत.


भारत-वेस्ट इंडिज वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. भारताने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात कॅरेबियन संघाने भारताचा पराभव करत शानदार पुनरागमन केले. आता चाहत्यांच्या नजरा तिसऱ्या वनडेवर लागल्या आहेत. भारताने विडिंजला विजयासाठी 352 धावांचे आव्हान दिलेय. 






ईशान किशनची दमदार फलंदाजी -


सलामी फलंदाज ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करुन दिली. ईशान किशन याने वादळी अर्धशतक झळकावले. ईशान किशन याने ६४ चेंडूमध्ये ७७ धावांची खेळी केली. या खेळीत ईशान किशन याने आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले. ईशान किशन याने सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ईशान किशन याने प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.