AUS vs ENG, Ashes 2023 : थरारक, सनसनाटी, अविश्वसनीय. विशेषणं कमी पडावीत, असा खेळ स्टोक्सच्या इंग्लिश आर्मीने अँशेस मालिकेत करुन दाखवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी करुन दाखवली.


मालिकेची गोड सांगता स्ट्युअर्ट ब्रॉडने केली तशीच त्याच्या कसोटी कारकीर्दीचीही. 600 विकेट्सचा महाकाय पर्वत गाठत त्याने कसोटी क्रिकेटला बायबाय केलं. अखेरची विकेटही त्यानेच काढली आणि ओव्हलच्या मैदानात विजयोत्सव झाला.


इंग्लंड-ऑस्ट्रेलिया अँशेस मालिकेची नशा काही औरच असते. त्यातही सामन्यागणिक ती खेळाडूंमध्ये आणि क्रिकेटरसिकांमध्येही भिनत जाते. यंदाही तसंच झालं. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभवाच्या जबड्यातून विजयाचा घास बाहेर काढला. 227 ला 8 वरुन कमिन्स-लायन जोडीने कांगारुना विजयाच्या सिंहासनावर नेऊन बसवलं. झुंजार वृत्ती कांगारुंच्या रक्तात आहे, त्यामुळे ते हार कधीच मानत नाहीत. कमिन्स-लायन जोडीनेही तेच केलं. त्यांनी अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या तिखट माऱ्याला दोन हात केले. कमिन्सने आक्रमण केलं तर लायनने अप्रतिम टेम्परामेंट दाखवलं.


या अविश्वसनीय विजयानंतर दुसऱ्या कसोटीत कांगारुंनी वर्चस्व गाजवलं. स्मिथच्या लाजवाब शतकानंतर त्यांनी 91 रन्सची महत्त्वाची आघाडी घेतली आणि दुसऱ्या डावातही २५० ची वेस ओलांडत इंग्लंडसमोर ३७१ चं आव्हानात्मक लक्ष्य ठेवलं. मग 45 ला 4 वरुन इंग्लंडने जो कमबॅक केला, माझ्या मते तो या मालिकेचा टर्निंग पॉईंट होता. त्याला कारण ठरली स्टोक्सची अफलातून इनिंग. 300 मिनिटांमध्ये 214 चेंडूंमध्ये 155. नऊ चौकार, नऊ षटकार. तेही स्टार्क, कमिन्स, हेझलवूड या त्रयीसमोर. कांगारुंचं ब्लडप्रेशर त्याने थोड्या काळासाठी का होईना पण वाढवलेलं.


पुढच्या तीन सामन्यांमध्ये जो खेळ इंग्लंडने केला, त्याची वात या इनिंगने पेटवलेली.


पुढच्या तिसऱ्या कसोटीत वोक्स, वूड इंग्लंड संघात आले आणि इंग्लंडच्या आक्रमणाला तलवारीची धार आली. सोबत ब्रॉड आणि अँडरसन होतेच. उसळी, वेग आणि स्विंगचं कमाल मिश्रण या कॉम्बिनेशमुळे पाहायला मिळालं. दोघांनीही पुढच्या तीन सामन्यांमध्ये वेगवान खेळपट्टीवर पोसल्या गेलेल्या कांगारुंच्या फलंदाजीला नामोहरम केलं. वोक्स तर १९ विकेट्सह मालिकावीर ठरला. वूडही मागे नव्हता. त्यानेही 14 विकेट्स घेत वोक्सला अप्रतिम साथ दिली. फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांमध्येही पार्टनरशिप झाली की, काय होतं त्याचा रिझल्ट या दोघांनीही दाखवून दिला.


तर, चौथ्या मॅचमध्ये पावसाने इंग्लंडसाठी विजयाचा दरवाजा लावून घेतला, अन्यथा त्यांना जिंकण्याची गोल्डन अपॉर्च्युनिटी होती. पाचवी मॅचही थरारक झाली. पुन्हा पावसाचा व्यत्यय यामुळे ऑसी मालिकेत बाजी मारणार असं वाटत असतानाच पाचव्या दिवशी चहापानानंतर इंग्लिश आर्मीच्या गोलंदाजांनी बाऊन्सबॅक केलं. वोक्स, मोईन अलीने चिवट ऑसी फलंदाजांच्या इराद्यांना सुरुंग लावला आणि ब्रॉडला विजयाचं गिफ्ट देत अलविदा केलं. 600 विकेट्स घेणाऱ्या ब्रॉडनेच अखेरची विकेट घेतली आणि ओव्हलच्या मैदानात जल्लोष झाला.


मॅक्युलम-स्टोक्स या कोच-कॅप्टन जोडीचा अप्रोच मालिकेच्या निकालासाठी महत्वाचा ठरला. म्हणजे पाचच्या रनरेटने सातत्याने बॅटिंग करणं. अगदी पहिल्याच मॅचमध्ये डाव घोषित करुन पराभूत झाल्यानंतरही त्यांचा अटॅकिंग अँटिट्यूड होता. त्यातच इंग्लंडला क्राऊली-डकेट सारखे ओपनर्स आणि हॅरी ब्रूकसारखा आधारस्तंभ गवसलाय. पहिल्या कसोटीपासून ब्रूक्सच्या इनिंगची 32,46,50,4,3,75,61,85,7 ही आकडेवारी पाहा.


ऑसी टीमसमोर स्टार्क अँड कंपनीशी भिडणं म्हणजे निखाऱ्यावरुन चालणं. ब्रूक्स ही वाट चालला, नुसता चालला नाही तर त्याच्या बॅटने सातत्याने 50 प्लसच्या सरासरीने धावा केल्यात आणि त्या निखाऱ्याची धग कमी केली. कांगारुंच्या आक्रमणाला त्याने अरे ला कारे करण्याचीच हिंमत दाखवली. जी इंग्लिश क्रिकेटसाठी नक्कीच आशादायी आहे.


पीटरसन-फ्लिंटॉफ जोडीने गाजवलेल्या मालिकेसारखीच ही मालिका यादगार झाली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दोघांनीही तोडीस तोड खेळ केला. मालिका बरोबरीत राहिली, कसोटी क्रिकेट जिंकलं. जे टी-ट्वेन्टी, वनडेच्या जमान्यात प्रचंड आशादायी चित्र आहे.