IND Vs WI, 3rd ODI : तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला विजयासाठी 352 धावांचे आव्हान दिलेय. भारताकडून चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. हार्दिक पांड्याने जबराट फिनिशिंग टच दिला. तर ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात दिली. संजू सॅमसन यानेही दमदार अर्धशतक झळकावले. भारताने निर्धारित 50 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 351 धावांपर्यंत मजल मारली. 


सलामी फलंदाज ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करुन दिल. ईशान किशन याने वादळी अर्धशतक झळकावले. ईशान किशन याने ६४ चेंडूमध्ये ७७ धावांची खेळी केली. या खेळीत ईशान किशन याने आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले. ईशान किशन याने सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ईशान किशन याने प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. ईशान किशन बाद झाल्यानंतर शुभमन गिल याने डावाची सुत्रे हातात घेतली. शुभमन गिल याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.  त्यानंतर आक्रमक फलंदाजी केली. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याला संधीचे सोनं करता आले नाही. ऋतुराज गायकवाड ८ धावा काढून तंबूत परतला. 


ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी एकेरी दुहेरी धावसंख्यासोबत चौकार आणि षटकार ठोकले. संजू सॅमसन याने आक्रमक फलंदाजी केली. संजू सॅमसन याने ४१ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये संजू सॅमसन याने चार षटकार आणि दोन चौकार ठोकले. संजू बाद झाल्यानंतर शुभमन गिलही तंबूत परतला.  शुभमन गिल आणि संजू सॅमस न यांनी तिसऱ्या विकेटाठी ६९ धावांची भागिदारी केली. शुभमन गिल याने ९२ चेंडूमध्ये ८५ धावांचे योगदान दिले. या खेळीत गिल याने ११ चौकार लगावले. 


शुभमन गिल परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी धावसंख्या हालती ठेवली. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. पण मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादव बाद झाला. सूर्यकुमार यादवने दोन चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने ३५ धावांचे योगदान दिले. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी ६५ धावांची भागिदारी केली.


हार्दिक पांड्याचा फिनिशिंग टच - 


हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांमध्ये वादळी फलंदाजी केली. सूर्या बाद झाल्यानंतर हार्दिकने वादळी फलंदाजी केली. रविंद्र जाडेजाला हाताशी धरत भारताची धावसंख्या ३५० पार नेली. हार्दिक पांड्याने नाबाद ७० धावांची खेळी केली. या खेळीत पांड्याने पाच गगनचुंबी षटकार ठोकले. त्याशिवाय ४ खणखणीत चौकारही लगावले. रविंद्र जाडेजा याने नाबाद आठ धावांची खेळी केली. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी १९ चेंडूत नाबद ४२ धावांची भागिदारी केली. 



वेस्ट इंडिजकडून एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही.  रोमरिओ शेफर्ड याने ७३ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. अल्जारी जोसेफ, मोटी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.