IPL Mega Auction 2025: आयपीएल 2025 चा मेगा लिलाव (IPL Mega Auction 2025) 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पार पडला. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे याचे आयोजन करण्यात आले होते. मेगा लिलावात 182 खेळाडूंवर 639.15 कोटी रुपये खर्च झाले. यावेळी लिलावात 62 विदेशी खेळाडूंना खरेदी करण्यात आले. लिलावाचे आतापर्यंतचे सर्व विक्रमही मोडीत निघाले. ऋषभ पंत इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. तर वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले.
पाच महागडे खेळाडू कोणते ठरले?
लिलावातील पहिल्या पाच सर्वात महागड्या खेळाडूंवर नजर टाकल्यास ऋषभ पंत पहिल्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सने त्याला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. व्यंकटेश अय्यर हा तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले. अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांनाही पंजाब किंग्सने विकत घेतले. यावेळी अर्शदीप आणि युझवेंद्र चहलला संघात घेण्यासाठी पंजाब किंग्सने 18 कोटी रुपये मोजले.
हे दिग्गज खेळाडू राहिले Unsold-
आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडू होते ज्यांना कोणीही संघात घेतले नाही. त्यापैकी पहिले नाव डेव्हिड वॉर्नरचे आहे. वॉर्नरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. पण वॉर्नरला कोणीही विकत घेतले नाही. जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, फिन ऍलन, शार्दुल ठाकूर आणि मुस्तफिजुर रहमान यांना कोणीही खरेदी केले नाही. यासोबतच नवीन उल हक, डॅरिल मिशेल, रिले रौसो आणि जेम्स विंची यांच्यावर कोणीही बोली लावली नाही. भारताचा मयांक अग्रवालही विकला गेला नाही.
सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी बनला करोडपती -
मेगा लिलावात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी ठरला. वैभव फक्त 13 वर्षांचा आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले. वैभवने लहान वयातच मोठी कामगिरी केली आहे. त्याने भारतीय अंडर-19 संघासाठी शतक झळकावले आहे. वैभवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका सामन्यात शतक झळकावले होते.
कोणत्या संघाने किती खेळाडू खरेदी केले?
चेन्नई सुपर किंग्सने या लिलावात एकूण 25 खेळाडू खरेदी केले. त्यात 7 परदेशी खेळाडू आहेत. दिल्ली कॅपिटल्सने 23 खेळाडूंना खरेदी केले. त्यात 7 परदेशी खेळाडू आहेत. गुजरात टायटन्सने 7 परदेशी खेळाडूंसह एकूण 25 खेळाडूंना खरेदी केले. कोलकाता नाईट रायडर्सने 8 परदेशी खेळाडूंसह 21 खेळाडूंना खरेदी केले. लखनौ सुपर जायंट्सने एकूण 24 खेळाडूंना खरेदी केले. त्यात 6 परदेशी खेळाडू आहेत. मुंबई इंडियन्सने 23 खेळाडू घेतले. त्यात 8 परदेशी आहेत. पंजाब किंग्जने 25 खेळाडू खरेदी केले. त्यात 8 परदेशी आहेत. राजस्थानने 6 परदेशी खेळाडूंसह 20 खेळाडूंना खरेदी केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 22 खेळाडू घेतले. त्यात 8 परदेशी आहेत. सनरायझर्स हैदराबादने 20 परदेशी खेळाडूंना खरेदी केले. त्यात 7 परदेशी आहेत.