Delhi Capitals Appoint Axar Patel As Captain नवी दिल्ली: आयपीएल सुरु होण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी बाकी असताना दिल्ली कॅपिटल्सनं त्यांचा कॅप्टन जाहीर केला आहे. दिल्ली कॅपिटल्सनं कॅप्टन म्हणून ऑलराऊंडर अक्षर पटेलच्या नावाची घोषणा केली आहे.  यापूर्वी रिषभ पंतनं दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं होतं. आता रिषभ पंत लखनौ सुपर जाएंटस संघात गेल्यानं नवी दिल्ली नवा कर्णधार शोधावा लागला. टी 20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगली कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलवर कॅप्टन म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  


केएल राहुलच्या नावाची चर्चा मात्र...


आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं केएल राहुलला 14 कोटी रुपये मोजून खरेदी केलं होतं. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन केएल राहुल होईल, अशी शक्यता होती. काही मीडिया रिपोर्ट्स नुसार केएल राहुलला कॅप्टनपद देण्याचा दिल्ली कॅपिटल्सचा विचार होता. मात्र, केएल राहुलनं ती ऑफर नाकारली होती. यामुळं दिल्ली कॅपिटल्सनं अक्षर पटेलला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सनं सोशल मीडियावर 2 मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करत  जाहीर केलं की अक्षर पटेल टीमचं नेतृत्व करेल.  






अक्षर पटेलचं आयपीएल करिअर


अक्षर पटेल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये खेळला आहे. आयपीएलच्या 150 सामन्यांमध्ये अक्षर पटेलनं 130.88 च्या स्ट्राइक रेटनं आणि 21.47 च्या सरासरीनं  1653 धावा केल्या आहेत. अक्षर पटेलनं गोलंदाज म्हणून 7.28 च्या इकोनॉमीनं 25.2 च्या स्ट्राइक रेटनं 123 विकेट घेतल्या आहेत. 21 धावात 4 विकेट ही  अक्षर पटेलची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. 


भारतीय संघातही दमदार कामगिरी 


अक्षर पटेलनं भारतीय क्रिकेट संघात देखील चांगली कामगिरी केली आहे. भारतानं वेस्ट इंडिजमध्ये गेल्या वर्षी जून महिन्यात टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामध्ये अक्षर पटेलची ऑलराऊंडर म्हणून कामगिरी महत्त्वाची ठरली होती. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत देखील अक्षर पटेलनं महत्त्वाच्या आणि मोक्याच्या क्षणी संघाला विकेट मिळवून दिल्या. भारताच्या फलंदाजीमध्ये अक्षर पटेलला पाचव्या स्थानावर खेळवण्याचा निर्णय देखील संघ व्यवस्थापनानं घेत त्याच्यावर विश्वास दाखवला. आता अक्षर पटेल दिल्ली आयपीएलच्या विजेतेपदापर्यंत घेऊन जाण्यात यश मिळवतो का ते पाहावं लागेल. 


इतर बातम्या : 


IPL 2025: इंग्लंडच्या आक्रमक खेळाडूवर आयपीएलमध्ये 2 वर्षांची बंदी; बीसीसीआयच्या निर्णयाने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ


बातमी अपडेट होत आहे...