BCCI On IPL 2024 Venue : क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलचं (IPL 2024) वेड लागलं आहे. क्रिकेट चाहते आतुरतेने इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी हंगामाची वाट पाहत आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएलचं ठिकाण आणि तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल 2024 ला सुरुवात होण्याची शक्यता आहे. याशिवाय आयपीएलचं ठिकाणही अद्याप ठरलेलं नाही. आयपीएल भारतात होणार की परदेशात याबाबतही स्पष्ट माहिती पुढे आलेली नाही.
यंदाचा आयपीएल हंगाम भारतात की परदेशात?
यंदा भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आयपीएलचे आयोजन परदेशात होणार की भारतात, याबाबत संभ्रम कायम आहे. याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आयपीएल हंगाम भारतात खेळवण्यात आला होता. पण, 2009 आणि 2014 मध्ये आयपीएल चॅम्पियनशीप परदेशात आयोजित करण्यात आली होती. आयपीएल 2009 दक्षिण आफ्रिकेत तर, आयपीएल 2014 दुबईत आयोजित करण्यात आली होती. आता यंदाच्या आयपीएल हंगामाबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या प्रश्नावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी उत्तर दिलं आहे.
'सरकारसोबत चर्चेनंतर निर्णय घेणार'
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी इनसाइडस्पोर्ट (Insidesport) सोबत केलेल्या मुलाखतीत आयपीएल 2024 भारतात होणार की परदेशात यासंदर्भात अपडेट माहिती दिली आहे. राजीव शुक्ला यांनी सांगितलं की, आयपीएल 2024 चा हंगाम भारतात खेळवला जाईल की परदेशात, सध्या या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आम्ही सरकारशी चर्चा करू, त्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यांनी पुढे सांगितलं की, भारत सरकारशी आमची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आयपीएल 2024 चा हंगाम भारतात खेळवायचा की नाही याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालय घेईल.
महिला प्रीमियर लीगबाबत अपडेट
याशिवाय राजीव शुक्ला यांनी वुमन्स प्रीमियर लीगच्या (Womens Premier League) ठिकाणाबाबतही माहिती दिली आहे. राजीव शुक्ला म्हणाले की, महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राचे सामने बंगळुरू आणि दिल्लीत खेळवले जातील. WPL च्या यंदाच्या मोसमात फक्त दोन ठिकाणी सामने खेळवण्यात येणार आहेत. राजीव शुक्ला म्हणाले की, महिला प्रीमियर लीगची तयारी सुरू आहे. डब्ल्यूपीएलमधील निम्मे सामने बेंगळुरूमध्ये आणि निम्मे दिल्लीत होतील. आयपीएल 2024 सीझन 22 मार्चपासून सुरू होऊ शकतो. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :