IPL 2023 : आगामी आयपीएल पूर्वीच मुंबई इंडियन्सला एक मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे आयपीएलच्या आगामी 16 व्या सत्रातून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. बुमराह मागील बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. सप्टेंबर 2022 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला होता, तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तेव्हापासून बुमराह आशिया कप 2022 आणि T20 विश्वचषक 2022 ला मुकला आहे. त्यानंतर आता आगामी आयपीएललाही तो मुकणार अशी माहिती समोर येत आहे. पाठीच्या दुखापतीने बुमराह त्रस्त असून त्याची आणखी एक शस्त्रक्रिया होणार अशीही माहिती समोर येत आहे. त्यामुळेच तो आगामी आयपीएलला मुकणार आहे. दरम्यान या सर्वाबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून आली नसली तरी त्याच्या सावरण्याबाबतही कोणतेच अपडेट बऱ्याच दिवसांपासून आलेले नाहीत.


मुंबई संघाची अडचण वाढली


बुमराह हा मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. गेल्या मोसमात मुंबईची कामगिरी खराब झाली असली तरी बुमराहने गोलंदाजीचं जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. IPL 2022 च्या 14 सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 25.53 च्या सरासरीने एकूण 15 विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत तो यावेळी संघात नसल्याने मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी विभाग अडचणीत येऊ शकतो.


मागील 5-6 महिन्यांपासून क्रिकेटपासून आहे दूर 


बुमराह मागील 5-6 महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्या सामन्यानंतर बुमराहला दोनदा दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत बुमराहने दुखापतीनंतर पुनरागमन केले.


आतापर्यंतची बुमराहची आंतरराष्ट्रीय कारकीर्द


बुमराहने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 30 कसोटी, 72 एकदिवसीय आणि 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 21.99 च्या सरासरीने 128 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 24.30 च्या सरासरीने 121 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर बुमराहने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एकूण 70 विकेट घेतल्या आहेत.


पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह संघाबाहेर


गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकापूर्वी बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान खेळला होता. पण त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर पडावं लागलं होतं. आता जवळपास 8 महिने उलटून गेले आहेत. अशातच बुमराहच्या फिटनेसबद्दल समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, तो आयपीएल 2023 च्या सीझनमधून पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. परंतु क्रिकबझच्या एका बातमीनुसार, जयप्रीत बुमराह संपूर्ण सीझनमधून बाहेर राहण्याची जास्त शक्यता आहे. 


हे देखील वाचा-