T20 World Cup 2021: युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. पात्रता फेरीच्या सामन्यानंतर शनिवारपासून सुपर-12 च्या लढतींना सुरुवात होणार आहे. दोन्ही सराव सामन्यात भारतीय टीमने विजय मिळवत विश्वचषक विजयाचा आपण दावेदार असल्याची चुणूक दाखवली आहे. अनेक दिग्गजांनी या स्पर्धेसाठी भारताच्या टीमला विजेतेपदाचं दावेदार म्हटलेय. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमामचाही समावेश आहे. इंजमामने आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना यंदाच्या विश्वचषक विजयाचा भारतीय संघाला प्रबळ दावेदार म्हटलं आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे जगभरातील क्रीडा रसिकांचं लक्ष असते. क्रीडा रसिकांसाठी ही मोठी मेजवानी समजली जाते. यासामन्यापूर्वी पाकिस्तानच्या इंजमामने भारतीय संघाला विश्वचषकाच्या विजयाचा प्रबळ दावेदार म्हटलं आहे. इंजमामच्या मते, युएईमधील परिस्थिती आशियातील परिस्थितीसारखी आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. इंझमाम उल हक म्हणाला की, भारतीय संघानं दोन्ही सराव सामने सहज जिंकले. ऑस्ट्रेलियाविरोधातील सराव सामन्यात 155 धावांचं लक्ष अतिशय सहज पार केलं. विराट कोहलीला फलंदाजीला यायाचीही गरज भासली नाही. येथील परिस्थिती आशियातील परिस्थितीशी मिळतीजुळती आहे. अशा परिस्तितीत भारतीय संघ जगातील सर्वात धोकादायक संघ ठरु शकतो. टी-20 मधील इतर संघापेक्षा भारतीय संघाचं विजयाची संधी जास्त आहे.


भारतीय संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. फलंदाजीसह गोलंदाजीही मजबूत आहे. स्पर्धा जसजशी पुढे सरकत जाईल खेळपट्टी फिरकी गोलंदाजासाठी पोषक होईल. अशातच भारतीय संघाकडे जाडेजा अन् अश्विनसारखे अनुभवी फिरकीपटू आहेत. यासोबत भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी चांगल्या पद्धतीने खेळतात, असं इंझमाम म्हणाला.


भारत-पाक सामन्यावर काय म्हणाला इंजमाम?


24 ऑक्टोबर रोजी होणारा भारत आणि पाकिस्तान हा सामना फायनल आधीची फायनल आहे. इतर दुसऱ्या सामन्यापेक्षा या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं जास्त लक्ष असणार आहे. 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानने सुरुवात आणि शेवट केला. दोन्ही सामने फायनलसारखे होते. पहिला सामना जिंकणाऱ्या संघाचं मनोबोल नक्कीच वाढेल. स्पर्धेतील ५० टक्के दबाव कमी होईल.