IND vs SL : बंगळुरुमध्ये खेळवण्यात आलेल्या पिंक बॉल कसोटीत भारताने श्रीलंकेला 238 धावांनी पराभूत करुन मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. टीम इंडियाने कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच सामना संपवला आणि विजय संपादन केला. पुरस्कार सोहळा पार पडला त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने चषक घेतला आणि अशा खेळाडूकडे सोपवला ज्याचं अजून पदार्पणही झालेलं नाही.


कर्णधार रोहित शर्माने चषक घेतल्यानंतर ग्रुप फोटोसाठी जेव्हा संघाजवळ आला तेव्हा त्यांनी चषक प्रियांक पांचालकडे सोपवला. फोटो सेशनमध्ये प्रियांक पांचालच चषक हातात घेऊन मध्यभागी उभा असून इतर खेळाडू त्याच्या आजूबाजूला उभे आहेत. प्रियांक पांचालच्या बाजूला यूपीचा सौरभ कुमार आहे. त्याला कसोटी संघात जागा तर मिळाली परंतु प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.




महेंद्रसिंह धोनीच्या काळापासून ही परंपरा सुरु झाली. मालिका जिंकल्यानंतर मिळणारा चषक कर्णधार संघातील सर्वात तरुण किंवा नव्या खेळाडूकडे सोपवतो. विराट कोहलीनेही कर्णधार असतानाही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आणि आता रोहित शर्मा देखील तेच करत आहे.


प्रियांक पांचाल पदार्पणाच्या प्रतीक्षेत
प्रियांक पांचालची कसोटी मालिकेसाठी निवड झाली होती पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. याआधी तो भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेलाही गेला होता. 31 वर्षीय प्रियांक पांचालचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप पदार्पण झालेलं नाही. पण प्राथमिक श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर बऱ्याच धावा आहेत.


प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रियांक पांचालने 101 सामने खेळले असून त्यामध्ये 45 पेक्षा जास्त सरासरीने 7068 धावा केल्या आहे. प्रियांक पांचालच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 24 शतकं आणि 26 अर्धशतकांची नोंद आहे.


भारताने  दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्विप दिला. मोहाली कसोटीत भारताने एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला होता तर दुसरा सामना 238 धावांनी जिंकला. त्याआधी टी-20 मालिकेतही भारताने श्रीलंकेला क्लीन स्विप दिला होता.