Indian Cricket Team In U19 World Cup 2024 : अंडर 19 विश्वचषकात भारतीय युवा (Team India) संघाची विजयी घौडदौड सुरुच आहे. सुपर 6 सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा 132 धावांनी (IND vs NEP) पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये (Semi Final) दिमाखात प्रवेश केलाय. उदय सहारनच्या (Uday Saharan) नेतृत्वातील भारतीय संघाने लागोपाठ पाचव्या विजयाची नोंद केली आहे. सुपर 6 च्या पहिल्या सामन्यात भारताच्या युवा ब्रिगेडने न्यूझीलंड संघाचा 214 धावांनी पराभव केला आहे.
सुपर 6 सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात 297 धावांचा डोंगर उभारला. सचिन धस याने 116 धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार उदय सरहन यानेही शतक ठोकले. फलंदाजांनी चोख कामगिरी बजावल्यानंतर गोलंदाजांनीही आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. गोलंदाजांनी नेपाळला 165 धावांपर्यंत रोखलं. सोम्य पांडे याने 29 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. त्याशिवाय अर्शिन कुलकर्णी याने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. सचिन धस याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आतापर्यंत टीम इंडियाचा प्रवास कसा राहिलाय ?
भारतीय युवा ब्रिगेडने विश्वचषकात आतापर्यंत शानदार कामगिरी केली. उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आतापर्यंत एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. सलग पाच सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. युवा ब्रिगेडचा सामना आता दक्षिण आफ्रिका संघाविरोधात होणार आहे. भारतायी संघाने आतापर्यंत बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका, न्यूझीलंड आणि नेपाळ संघाचा पराभव केला. भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये आता दक्षिण आफ्रिका संघाला रोखावं लागणार आहे. उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघापुढे हे तगडं आव्हान असेल. भारताच्या संघाने आतापर्यंत सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बांगलादेशविरात विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात युवा ब्रिगेडने 84 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 201 धावांनी सुपडा साप केला. तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला 201 धावांनी नमवलं. न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव करत टीम इंडियाने विजयाचा चौकार लगावला. पाचव्या सामन्यात नेपाळचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. भारतीय संघाने तीन सामने 200 पेक्षा जास्त धावांनी जिंकले आहेत. आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना यजमान दक्षिण आफ्रिकाविरोधात होणार आहे. यजमानांना रोखण्याचं भारतापुढे मोठं आव्हान असेल.