KL Rahul Reaction On IND vs AUS: केएल राहुलच्या नेतृत्वातील टीम इंडियाने शुक्रवारी वनडे सामन्यात मोहालीचे मैदानात मारले. भारतीने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. तब्बल २७ वर्षानंतर मोहालीमध्ये ऑस्ट्रलियाच्या नांग्या ठेचण्यात भारतीय संघाला यश लाभले.  १९९६ मध्ये भारताने मोहलीमध्ये ऑस्ट्रलियाचा पराभव केला होता.  त्यानंतर २०२३ मध्ये भारताने या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या विजयानंतर केएल राहुल याला कर्णधारपदी कमबॅक झाल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर राहुल म्हणाला की, कर्णधार होण्याची ही पहिली वेळ नाही, माझ्यासोबत नेहमीच असे होते. मला याची सवय आहे आणि मला हे आवडते. 


आशिया चषकात कोलंबोमध्ये खेळलो. त्यानंतर आता भारतात खेळण्याचा अनुभव आनंददायी आहे.  मात्र, येथेही दुपारी कडक ऊन होते. अशा परिस्थितीत खेळणे शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक होते. पण आम्ही आमच्या फिटनेसवर खूप काम केले आहे, जे मैदानावर दिसून आले.  पहिल्या वनडे सामन्यात आम्ही 5 गोलंदाजांसह खेळलो.  पाचही गोलंदाजांना प्रत्येकी १० षटके टाकावी लागली. उकाड्यामुळे हे शारीरिकरीत्या आव्हानात्मक होऊन बसते. मात्र, आम्ही सर्वांनी आमच्या फिटनेसवर काम केले आहे आणि हे मैदानावरही दिसत आहे. 


भारतीय कर्णधार केएल राहुलने टीम इंडियाच्या फलंदाजीवर आपले मत व्यक्त केले. राहुल म्हणाला की, शुभमन गिल बाद झाल्यानंतर परिस्थिती थोडी कठीण होती, पण माझ्या आणि सूर्यकुमार यादवमध्ये चांगली भागीदारी झाली. आव्हानात्मक परिस्थितीत स्वतःला सिद्ध करायचे होते. फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवशी सतत बोलत राहायचा.  स्ट्राईक केव्हा रोटेट करायची आणि मोठे फटके कधी मारायचे हे आम्हाला माहीत होते.  आम्ही चांगले क्रिकेट शॉट्स खेळण्याविषयी बोलत राहिलो.  त्यामुळे आम्हाला आणखी चांगल्याप्रकारे हा सामना जिंकायचा होता.


तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारत अव्वल स्थानी -


पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानाववर झेप घेतली आहे. भारतीय संघ याआधीच कसोटी आणि टी २० मध्ये पहिल्या स्थानावर विराजमान होता. अशा प्रकारे भारताने तिन्ही प्रकारमध्ये अव्वल स्थानावर कब्जा केलाय. आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघाचे 115 रेटिंग गुण आहेत. भारताशिवाय पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे टॉप-१० संघांमध्ये आहेत.


आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ ११८ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. ICC T20 क्रमवारीत भारतीय संघ 264 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ २६१ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.