ICC Rankings : मोहली वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इतिहास रचलाय. टीम इंडिया वनडे, कसोटी आणि टी२० मध्ये अव्वल स्थान पटकावले. 


मोहालीत २७ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचल्या - 


केएल राहुलच्या नेतृत्वातील टीम इंडियाने मोहाली वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. तब्बल २७ वर्षानंतर मोहालीमध्ये ऑस्ट्रलियाच्या नांग्या ठेचण्यात भारतीय संघाला यश लाभले.  १९९६ मध्ये भारताने मोहलीमध्ये ऑस्ट्रलियाचा पराभव केला होता. 


तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारत अव्वल स्थानी -


पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानाववर झेप घेतली आहे. भारतीय संघ याआधीच कसोटी आणि टी २० मध्ये पहिल्या स्थानावर विराजमान होता. अशा प्रकारे भारताने तिन्ही प्रकारमध्ये अव्वल स्थानावर कब्जा केलाय. आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघाचे 115 रेटिंग गुण आहेत. भारताशिवाय पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे टॉप-१० संघांमध्ये आहेत.


 कसोटी आणि टी२० मध्येही भारत पहिल्या स्थानावर ...


आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ ११८ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.


ICC T20 क्रमवारीत भारतीय संघ 264 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ २६१ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ ICC T20 क्रमवारीत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. मात्र, भारतीय संघाने ICC कसोटी, ODI आणि T20 फॉरमॅटमध्ये नंबर-1 संघ बनून इतिहास रचला आहे. याआधी २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाने तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वल स्थान पटकावले होते.