IND vs AUS : मोहाली येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान भारताने आठ चेंडू आणि पाच विकेट राखून सहज पार केला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली. 


या विजयासह भारताने वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावलेय. भारतीय संघ तिन्ही फॉर्मेटमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे. आयसीसीने पोस्टर पोस्ट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. 






ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दणक्यात सुरुवात केली. शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी १४२ धावांची दमदार सलामी दिली. ऋतुराज आणि गिल यांनी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाचा समाचार घेतला. दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली. भारत सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण त्याचवेळी अॅडम जम्पा याने ऋतुराज गायकवाड याला तंबूत पाठवला. ऋतुराज गायकवाड याने ७७ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. या खेळीत ऋतुराजने दहा चौकार मारले. ऋतुराज बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर लगेच धावबाद झाला. त्यानंतर शुभमन गिल याला झम्पा याने तंबूत पाठवले. शुभमन गिल याने ६३ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दहा धावांत भारताने तीन विकेट लागोपाठ गमावल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतर इशान किशन आणि केएल राहुल यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पॅट कमिन्स याने जोडी फोडली. इशान किशन याला १८ धांवावर कमिन्सने बाद केले. 


किशन बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि सूर्या यांनी ऑस्ट्रेलियाचा समाचार घेतला. सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. एकेरी दुहेरी धावसंख्यावर भर दिला. पण त्यानंतर चौकार-षटकार ठोकले.  सूर्यकुमार यादव याने दमदार अर्धशतक ठोकले. सूर्यकुमार आणि केएल राहुल यांच्यामध्ये ८० धावांची भागिदारी झाली. सूर्यकुमार यादवने पाच चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने ५० धावांची खेळी केली. सूर्या बाद झाल्यानंतर केएल राहुलने फिनिशिंग टच दिला. केएल राहुलने कर्णधाराला साजेशी खेळी केली. केएल राहुलन ६३ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. 


ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पा याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्यासिवाय सीन एबॉट आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.