ICC U19 World Cup: अंडर-19 विश्वचषकाचा थरार नुकताच पार पडला. अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला 4 विकेट्सनं पराभूत करत पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलं. दरम्यान, या संपूर्ण स्पर्धेत भारताने पाच पैकी पाच सामने जिंकत अप्रतिम कामगिरी केली होती. तर याआधीही चार वेळा भारताने अंडर 19 विश्वचषक जिंकला आहे.

भारताने आतापर्यंत 2000, 2008, 2012, 2018 आणि आता 2022 साली या विश्वचषकावर नाव कोरलं आहे. भारताने याआधी चार वेळा जिंकलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेदरम्यानच्या भारतीय कर्णधारांपैकी तीन कर्णधारांनी भारतीय क्रिकेट गाजवलं असून एका कर्णधाराला मात्र हवी तशी संधी मिळाली नाही. तर नेमके हे कर्णधार कोण आहेत? आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मोहम्मद कैफ

भारतीय संघात खालच्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ याच्या नेतृत्त्वाखाली 2000 साली  विश्वचषक जिंकला होता. यावेळी संघात युवराज सिंग हा स्टार खेळाडू असून त्याने मालिकावीराचा खिताबही मिळवला होता.

विराट कोहली

2000 सालानंतर 2008 साली भारताने पुन्हा एकदा अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरलं. यावेळी कर्णधार होता भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असणारा विराट कोहली. कोहलीला रवीद्र जाडेजा, मनीष पांडे या खेळाडूंची साथ मिळाली होती.

उन्मुक्त चंद

या यादीतील असा एकमेव खेळाडू ज्याला भारतीय संघात चमकण्याची संधी मिळाली नाही तो म्हणजे उन्मुक्त चंद. 2012 साली भारताला विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार उन्मुक्त याला खास संधी न मिळाल्याने त्याने काही काळापूर्वीच भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत अमेरिकेत पोहोचला आहे.

पृथ्वी शॉ

2012 नंतर थेट 2018 मध्ये भारताने मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली अंडर 19 विश्वचषक उचलला. यावेळी शुभमन गिल हा स्टार फलंदाज असून त्याने मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला होता.

2022 साली यशच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकला विश्वचषक

यानंतर आता थेट 2022 साली भारताने अंडर 19 विश्वचषक पुन्हा जिंकत सर्वाधिक वेळा हा खिताब मिळवला आहे. यंदा भारताने स्पर्धेतील पाच पैकी पाचही सामने जिंकत स्पर्धा जिंकली. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांवेळी यशसह इतर काही खेळाडू कोरोनाबाधित झाले असताना निशांत सिंधू याने कर्णधारपद सांभाळला होतं. दरम्यान अंतिम सामन्यात 4 विकेट्सने इंग्लंडला मात देत भारताने हा सामना आणि स्पर्धा जिंकली आहे.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha