IND vs PAK, T20 WC 2022 :  क्रिकेटच्या मैदानात ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा मौका-मौका पाहायला मिळणार आहे. टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहेत. 23 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचं वेळापत्रक नुकतेच आयसीसीने जाहीर केलं होतं. 16 ऑक्टोबरपासून पात्रता फेरी सामन्यांनी टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. तर 22 ऑक्टोबरपासून सुपर-12 सामन्यांचा थरार सुरु होईल. भारताच्या गटात पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि पात्रता फेरीतील दोन संघ असतील. तर दुसऱ्या गटात न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तानसह पात्रता फेरीतील दोन संघांचा समावेश असेल. 2021 साली झालेल्या टी-20 विश्वचषक सामन्यात पाकिस्ताननं भारताचा पराभव केला होता. त्यामुळे या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. मैदानाबाहेरही भारत-पाकिस्तान या सामन्याचं वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भारत पाकिस्तान सामन्याची तिकिटे अवघ्या तासभरत संपली आहे.  


वातावरण तापण्यास सुरुवात - 
23 ऑक्टोबर 2022 रोज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या MCG मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या मैदानावर एक लाख जण बसू शकतात, अशी व्यवस्था आहे. सोमवारी टी20 साठी विश्वचषकाच्या तिकिट विक्रीला सुरुवात झाली.  दोन लाख तिकिटं विक्रीसाठी होती, यामध्ये 60 हजार तिकिटं भारत पाकिस्तान सामन्याची होती. ही तिकिटं (Tickets Sold Out) अवघ्या तासभरात विकली गेली. तिकिटाची किंमत 20 डॉलर ते 110 डॉलर इतकी किंमत आहे. अवघ्या तासभरात सर्व तिकिटं विकली गेली आहेत. सामन्यापूर्वीच मैदानावर वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.


टी20 मध्ये भारताचे सामने कधी आणि कुठे?


-    भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर (मेलबर्न)


-    भारत विरुद्ध ग्रुप ए रनर-अप, 27 ऑक्टोबर (सिडनी)


-    भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका, 30 ऑक्टोबर (पर्थ)


-    भारत विरुद्ध बांग्लादेश, 2 नोव्हेंबर (एडिलेड)


-    भारत विरुद्ध ग्रुप बी विजेता, 6 नोव्हेंबर  (मेलबर्न)


13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर फायनल - 
T20 विश्वचषकाचे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी होणार आहेत. उपांत्य सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी तर विश्वचषकाचा फायनल सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे.