Rajeshwari Gayakwad Team India: भारताची स्टार महिला क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड अडचणीत येण्याची शक्यता आहे. शॉपिंग करताना सुपर मार्केटमध्ये भांडणं केल्याचा राजेश्वरी गायकवाडवर आरोप आहे. कर्नाटकमधील विजयपूर येथील सुपर मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सीसीटीव्हीमधील राजेश्वरी गायकवाडचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 


भारतीय महिला संघातील स्टार क्रिकेटर राजेश्वरी गायकवाड कर्नाटकमधील विजयपूर येथील एका सुपर मार्केटमध्ये शॉपिंग करताना कर्मचाऱ्यांबरोबर भांडणं केल्याचा आरोप आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टाफसोबत बाचाबाची झाल्यानंतर राजेश्वरी गायकवाडनं मित्रांसोबत सुपर मार्केटमध्ये दंगा घातला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेय, त्यामधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणाबाबत राजेश्वरी गायकवाडकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही. 


प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, राजेश्वरी गायकवाड विजयपूरमधील एका सुपर मार्केटमध्ये कॉस्मेटिक्स सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. यावेळी सुपर मार्केटमधील कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची झाली. त्यानंतर काही ओळखीच्या लोकांसोबत सुपर मार्केटमध्ये आली अन् कर्मचाऱ्यावर हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सुपर मार्केटमधील कर्मचार्यांनी सीसीटीव्ही फुटेज घेऊन जात पोलिसांत तक्रार करण्याचा विचार केला होता. पण दोन्ही बाजूकडून मवळा भूमिका घेण्यात आली आणि सामंजस्याने हा वाद मिटवला. पण सोशल मीडियावर या प्रकरणावर चर्चा सुरु आहे. नेटकरी राजेश्वरी गायकवाडला ट्रोल करत आहेत.  
 





राजेश्वरीचं क्रिकेट करिअर -

राजेश्वरी गाडकवाडचं आंतरराष्ट्रीय करिअर जबरदस्त राहिलेय. जानेवारी 2014 मध्ये राजेश्वरीनं भारतीय महिला संघाकडून एकदिवसीय मध्ये पदार्पण केले होते. राजेश्वरी गायकवाडने 64 सामन्यात 99 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान पाच वेळा चार किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. राजेश्वरीला कसोटीमध्ये आपली चमक दाखवता आलेली नाही. राजेश्वरीनं दोन कसोटी फक्त पाच विकेट घेतल्या आहेत. राजेश्वरीनं भारतीय महिला संघासाठी टी 20 सामनेही खेळले आहेत. 44 आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात राजेश्वरीनं  54 विकेट्स घेतल्या आहेत. राजेश्वरीनं भारतीय संघासाठी अनेकदा चमकदार कामगिरी केली आहे. राजेश्वरी गायकवाड सध्या भारतीय महिला संघातील आघाडीची गोलंदाज आहे.  


आणखी वाचा 
इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना कसोटीत धुतलं, एका दिवसात 506 धावा, 112 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला