Vijay Hazare Trophy Final 2022: विजय हजारे चषकाच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने आसामचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. तर सौराष्ट्राने कर्नाटकचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. दोन डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यात फायनलचा सामना होणार आहे. महाराष्ट्राच्या संघाने विजय हजारे चषकाच्या वन-डे स्पर्धेत पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक मारली आहे.
महाराष्ट्राचा आसामवर 12 धावांनी विजय -
तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि अंकित बावने (Ankit Bawne) यांच्या शानदार शतकाच्या बळावर महाराष्ट्राने आसामचा 12 धावांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या संघाने विजय हजारे चषकाच्या वनडे स्पर्धेत पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक मारली आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचा सामना सौराष्ट्रासोबत होणार आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने 126 चेंडूत 168 धावांची खेळी केली तर अंकित बावने याने 89 चेंडूत 110 धावांचा पाऊस पाडला. ऋतुराज गायकवाड आणि अंकित बावने यांनी 207 धावांची भागिदारी केली. गाकवाड आणि बावने यांच्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने 350 धावांचा डोंगर उभारला होता. महाराष्ट्राने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आसामने 338 धावांपर्यंतच मजल मारली. आसामची खराब सुरुवात झाली होती. 16 व्या षटकात आसामने 103 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर रिषव दास (53), शिवशंकर रॉय (78) आणि स्वरूपम पुरकायस्थ (95) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर आसाम विजायच्या जवळ पोहचला. पण महाराष्ट्राने अचूक गोलंदाजी करत फायनलमध्ये धडक मारली. महाराष्ट्राकडून राजवर्धन हंगारकर याने 4 बळी घेतले. तर मनोज इंगळे याने दोन जणांना तंबूत पाठवले. सत्यजीत आणि शमशुज्मा काजी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
ऋतुराज गायकवाडची वादळी खेळी
विजय हजारे चषकात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं वादळी फलंदाजी केली आहे. गायकवाडने प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस पाडला आहे. उत्तर प्रदेशचा तर धुव्वा उडवला. या सामन्यात त्यान 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी केली. ज्यात 10 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता. याशिवाय त्यानं एका सामन्यातील एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. उपांत्य सामन्यातही ऋतुराज गायकवाड याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. ऋतुराज गायकवाडच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे चषकात अंतिम फेरीत धडक मारली आहे.