India Wins Gabba Test : ब्रिस्बेनच्या गाबामध्ये खेळवण्यात आलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर तीन विकेट्सनी मात केली. चौथ्या कसोटी सामना खिशात घालत भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेलाही गवसणी घालती आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी बोनस जाहीर केला आहे. बीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी बोलताना सांगितलं की, 'टीमला पाच कोटी रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे.'





ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.


हा कसोटी सामना असला तरी भारतीय संघ दुसऱ्या डावात वन डे सामन्याप्रमाणेच फलंदाजी केली. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. परंतु युवा फलंदाज शुभमन गिलने 91 धावांची खेळी केली. त्याने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारताचा डाव सांभाळला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेही 24 धावा करुन माघारी परतला. मग चेतेश्वर पुजाराने रिषभ पंतला हाताशी घेत संयमी फलंदाजी केली. 56 धावा करुन तोही माघारी परतला. यानंतर रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने दमदार फलंदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. जिंकण्यासाठी दहा धावांची गरज असताना सुंदर 22 धावा करुन बाद झाला. यानंतर विजयासाठी तीन धावांची आवश्यकता असताना शार्दुल ठाकूर (2 धावा) माघारी परतला. मग रिषभ पंतने (89 धावा) ने विजयी चौकार लगावला आणि सामन्यासह मालिका खिशात घातली.


भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायदेशात दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत पराभव केला आहे. याआधी 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला होता. त्यावेळी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरोधात त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिका जिंकणारी आशिया खंडातील पहिली टीम बनली होती. आज पुन्हा एकदा भारताने ऑस्ट्रेलिया पराभूत करुन इतिहास रचला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :