England Series Selection इथं बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीचा खेळ संपताच सुरुवात होणार आहे, ती म्हणजे भारत- विरुद्ध इंग्लंड या मालिकेची. (India) भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपताच इंग्लंडचा क्रिकेट संघ भारतात येणार आहे. इथं त्यांना भारतीय भूमीत एकदिवसीय, टी20 आणि 4 कसोटी सामनेही खेळायचे आहेत. भारताकडून चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयची राष्ट्रीय निवड समिती (19 जानेवारीला) आज संघाची निवड करणार आहे. ही निवड पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी करण्यात येणार आहे.
सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) दौऱ्यावर आहे. याचदरम्यान मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास व्हर्च्युअल मिटींगमध्ये इंग्लंडसोबतच्या मालिकेसाठी संघाची निवड करण्यात येईल. यावेळी विराट कोहलीसुद्धा या बैठकीला उपस्थिती लावणार असल्याचं म्हटलं जात आहे.
विराट आणि चेतन शर्मा यांच्याव्यतिरिक्त संघ निवडीसाठीच्या या बैठकीत सुनील जोशी, देबाशिष मोहांती, हरविंदर सिंह यांच्यासह आणखीही काही सदस्यांची उपस्थिती असणार आहे.
IND Vs AUS 4th Test Live Score Updates
मोठे खेळाडू संघात परतण्यास सज्ज
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जवळपास आटोपत आला आहे. असं असतानाच दुखापतीमुळं संघापासून दूर असणारे अनुभवी आणि काही मोठे खेळाडू संघात परतण्यासाठी सज्ज असल्याचं चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, फिरकी गोलंदाज आर. अश्विन संघात परतण्याची स्पष्ट चिन्हं आहेत.
इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार प्रदर्शन करणारे टी. नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांना इंग्लंडसोबतच्या दौऱ्यात स्थान मिळण्याची चिन्हं मात्र धुसर आहेत.
गोलंदाजीच्या फळीसाठी भारतीय संघात कुलदीप यादव, शाहबाज नदीम, आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांची पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात वर्णी लागेल.
चेन्नईमध्ये 5 ते 9 फेब्रुवारी या दिवसांत इंग्लंडविरोधात पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. तर, 13 ते 17 फेब्रुवारी या काळात दुसरा कसोटी सामनाही चेन्नईमध्येच खेळला जाणार आहे. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून, हा दौरा संपवून संघ 27 जानेवारीला चेन्नईच्या दिशेनं रवाना होणार आहे.