IND Vs AUS Brisbane Test भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक सामन्यात अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळाली. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारतीय संघाला 328 धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करत संघाला यश मिळवून देण्याच्या हेतूनं भारतीय संघ मैदानात उतरला. पण, सुरुवातीच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी माघारी धाडल्यानंतर युवा खेळाडू ऋषभ पंत यानं अतिशय संयमी खेळीचं प्रदर्शन केलं. याच खेळीच्या बळावर त्यानं संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा विक्रमही मोडला.


पंतनं कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावांचा पल्ला ओलांडला आहे. त्यानं ही धावसंख्या 27 खेळींमध्ये पूर्ण केली. यासोबतच सर्वात कमी खेळींमध्ये 1 हजार धावांचा आकडा ओलांडणाऱ्या महेंद्रसिंह धोनी याचा विक्रम पंतनं मोडला आणि एक नवा विक्रम रचला.

मुख्य म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ऋषभ पंतनं दमदार कामगिरी केली आहे. त्यानं अवघ्या 16 कसोटी सामन्यांत 1000 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 40 टक्क्यांहून जास्तीच्या सरासरीनं आणि 70 हून जास्तीच्या स्ट्राईक रेटनं त्यानं धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्यानं 2 शतकं आणि तीन अर्धशतकं लगावली आहेत.

IND Vs AUS | 5 विकेट घेणारा सिराज वडिलांच्या आठवणीनं भावूक, आईच्या एका फोनकॉलनं दिली ताकद

ब्रिस्बेनच नव्हे, तर सिडनी कसोटीमध्येही पंतनं धमाकेदार खेळ केला होता. जिथं 97 धावांची नोंद त्याच्या नावे करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरोधात सलग 9 वेळा 25हून जास्त धावा खेळणाराही तो एकमेव खेळाडू आहे.