IND vs WI : वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारली.  कर्णधार रोवमन पॉवेल याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. वेस्ट इंडिज संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार रोव्हमन पॉवेलने 32 चेंडूत 48 धावा केल्या तर निकोलस पूरनने 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारतीकडून चहल आणि अर्शदीपने गोलंदाजीत २-२ बळी घेतले.


वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमॉन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रेंडन किंग आणि काइल मायर्स यांनी संयमी सुरुवात केली. पण चौथ्या षटकात चहल याने लागोपाठ दोन विकेट घेत विडिंजला बॅकफूटवर ढकलले. यानंतर फलंदाजीला आलेल्या निकोलस पूरनने येताच आपले इरादे स्पष्ट केले आणि पहिल्या 6 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 विकेट गमावून 54 धावांपर्यंत मजल मारली.


58 धावांवर विंडीज संघाला जॉन्सन चार्ल्सच्या रुपाने तिसरा धक्का बसला, तो अवघ्या 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार रोव्हमन पॉवेलने निकोलस पूरनला साथ दिली आणि धावसंख्या वेगाने वाढवत राहिली. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 38 धावांची भागीदारी पाहायला मिळाली.


या सामन्यात निकोलस पूरन 34 चेंडूत 41 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रोव्हमन पॉवेलने शिमरॉन हेटमायरसोबत 5व्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली. जिथे पॉवेल 48 धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी अखेरच्या षटकात माघारी परतताना भारतीय गोलंदाजांनी विंडीजच्या फलंदाजांना वेगवान धावसंख्या होऊ दिली नाही. 20 षटकांनंतर वेस्ट इंडिजचा संघ 6 गडी गमावून 149 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताच्या गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहलने 2-2, तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी 1-1 विकेट घेतली.


भारताचा 200 वा सामना -
भारतीय संघ आज आपला 200 वा टी 20 सामना खेळत आहे. भारताशिवाय फक्त पाकिस्तान संघाने 200 टी20 सामने खेळले आहेत. 2006 मध्ये सुरु झालेला प्रवास अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत या कालावधीत भारतीय संघाने अनेक विक्रम केले आहेत. भारतीय संघाने टी20 चा पहिला विश्वचषक जिंकला होता. 


भारतीय संघात कोण कोणते शिलेदार - 


शुभमन गिल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युदवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार


वेस्ट इंडिजच्या संघात कोण कोणते शिलेदार ?


काइल मेयर्स, जोन्सन चार्लस, शिमरोन हेटमायर, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, रोवमन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, आर. शेफर्ड,  अकिल हुसेन, अल्जारी जोसेफ, ओबेद मैकॉय.