India vs Sri Lanka series Schedule : टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तिथे पाच सामन्याची टी20 मालिका सुरु आहे. त्यानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे आणि तीन सामन्याची टी20 मालिका होणार आहे. या सहा सामन्याचं वेळापत्रक (India vs Sri Lanka T20 2024 Full Schedule ) बीसीसीआयकडून जारी करण्यात आले आहे.  26 जुलै ते 7 ऑगस्ट यादरम्यान टीम इंडिया श्रीलंकाविरोधात वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. टी20 चे सर्व सामना पल्लेकेल येथे होणार आहेत, तर वनडे सामने कोलंबो येथील मैदानात होणार आहेत. 


नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकावर टीम इंडियाने नाव कोरले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया स्पर्धेत अजय राहिली होती. स्पर्धेनंतर रोहित शर्माने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तर या स्पर्धेनंतर मुख्य कोच म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपुष्टात आलाय. भारतीय क्रिकेट बोर्डाकडून गौतम गंभीरची नवे कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर आपल्या शिकवणीला सुरुवात करणार आहे. 26 जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापासूनच गंभीर मुख्य कोच म्हणून आपला पदभार स्वीकरणार आहे.  टी20 विश्वचषकानंतर युवा भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघ सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. झिम्बाव्बे दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक आज जारी करण्यात आले आहे. 


टी20 मालिकेचं वेळापत्रक काय, कधी सामने?- 


पहिला टी20 सामना - शुक्रवार, 26 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम


दुसरा टी20 सामना - शनिवार, 27 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम


तिसरा टी20 सामना - सोमवार, 29 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम


वनडे सामन्याच्या मालिकेचं वेळापत्रक काय ?


पहिला वनडे सामना - गुरुवार, 1 ऑगस्ट 2024 -  दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो


दुसरा वनडे सामना - रविवार, 4 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो


पहिला वनडे सामना - गुरुवार, 7 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो






भारतीय संघाचा कर्णधार कोण?


श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. दोन दिवसात टीम इंडियाच्या शिलेदारांची नावं जाहीर करण्यात येतील, असं समोर आले आहे. श्रीलंका दौऱ्यात टी20 संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्माने टी20 मधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे आता कर्णधार कोण? याची चाचपणी सुरु आहे. वनडे संघाची धुरा केएल राहुल याला दिली जाऊ शकते. कारण, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्वचषकानंतर आराम देण्यात येणार असल्याचं समोर आलेय. त्यामुळे वनडे आणि टी20 संघाची धुरा वेगवेगळ्या खेळाडूकडे दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. दोन दिवसांमध्ये टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.