Suresh Devbhakt Passes Away : मुंबईकडून रणजी स्पर्धेत खेळणारे वसईतील पहिले क्रिकेटपट्टू सुरेश देवभक्त उर्फ दोदू यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरेश देवभक्त यांच्यावर आज विरारच्या आगाशी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने आगाशी गावावर शोककळा पसरली आहे. सुरेश देवभक्त यांच्या निधनाबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पकंज ठाकूर आणि सचिव अजिंक्य नाईक यांनी शोक व्यक्त करुन, त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.


अजित वाडेकरांच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघात बडोदा संघाविरुध्द रणजी स्पर्धेत पहिली संधी सुरेश देवभक्त यांना मिळाली होती. घणाघाती फलंदाजी आणि अचूक टप्प्यावरील ऑफ कटर्सने त्यांनी आपली कारर्किद गाजवली होती. त्यावेळी रणजीस्पर्धेत मुंबई संघात अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर, सुनील गावसकर, अशोक मंकड यासारखे तगडे खेळाडू होते. त्यात आगाशीच्या या खेळाडूनं आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता.  


नॅशनल क्रिकेट क्लब यंग मेन्स क्रिकेट आणि नवरोझ क्रिकेट संघातर्फे मुंबईतील स्थानिक स्पर्धातून सुरेश देवभक्त यांनी अनेक अष्टपैलू पराक्रम केले. आंतरकॉलेज स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शतक आणि चार बळी घेतले होते. अंतिम सामान्यात रुईयाविरोधात 35 धावा केल्या होत्या. प्रसिध्द कांगा क्रिकेटमध्ये 100 बळी आणि 100 धावा करणारा तो वसईतला एकमेव क्रिकेटपट्टू ठरला होता. 


हार्ड कॅसल वॉर्ड कंपनीतर्फे टाइम्स गटात खेळताना देवभक्तने बलाढ्य टाटा विरुध्द माजी कसोटीपट्टू सलीम दुराणीसह पाचव्या विकेटसाठी 187 धावा केल्या होत्या. त्यात देवभक्त यांनी  96 धावा काढल्या होत्या. याच जोरावर ती मॅच त्यांच्या टिमने जिंकली होती. त्यानंतर देवभक्त यांनी सेंट्रल बॅंक आणि नंतर टाट स्पोर्टस क्लबतर्फे ही खेळताना अनेक पराक्रम केले होते. देवभक्त यांनी कॉस्मोपॉलिटन ढाल क्रिकेट स्पर्धेत 206 धावा काढून, दिलीप सरदेसाईचा विक्रम मोडीत काढला होता.