India vs Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला (Ind vs SL) 32 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य होते.  चांगली सुरुवात करूनही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाचा सहज पराभव झाला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 97 धावांची भागिदारी केली, पण त्यानंतर सर्व फलंदाजांनी सहज शरणागती पत्करली. याआधी दोन्ही संघांमधील पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला होता. पहिल्या वनडेतही टीम इंडियाला 231 धावांचे लक्ष्य गाठता आले नव्हते. टीम इंडियाच्या पराभवामागील पाच कारणं जाणून घ्या...






1. टीम इंडियाच्या फलंदाजांचा सराव कमी-


टीम इंडियाच्या फलंदाज सरावात कमी पडत असल्याचं दिसून येतंय. केएल राहुल आणि श्रेयस अय्यरने आयपीएलनंतर मैदानात उतरले. विराट कोहली टी-20 विश्वचषकात शेवटचा सामना खेळला होता. रोहित शर्मा फॉर्मात असला तरी इतर फलंदाज मात्र संघर्ष करताना दिसत आहेत.


2. टीम इंडियाचा बचावात्मक दृष्टीकोन-


विरोधी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज बचावात्मक अवस्थेत दिसत आहेत. टीम इंडियाचे खेळाडू फिरकीपटूंविरुद्ध बचाव करत आहेत, त्यामुळे त्यांना चेंडूला पूर्ण गती देण्याची संधी मिळत आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 5 भारतीय फलंदाज पायचीत बाद झाले.


3. श्रीलंकेच्या खालच्या फळीतील फलंदाज टीम इंडियासाठी अडचणीचे-


एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये श्रीलंकेचे खालच्या फळीतील फलंदाज टीम इंडियासाठी अडचणीचे ठरले. श्रीलंकेने 35 व्या षटकात 136 धावांवर 6 विकेट्स गमावल्या होत्या, परंतु तरीही श्रीलंकेला 240 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या 15 षटकात 100 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या. यामध्ये केवळ 3 फलंदाजांना बाद करता आले. त्याचवेळी पहिल्या वनडेमध्ये देखील असाच प्रकार पाहायला मिळाला.


4. श्रीलंकेच्या पार्ट टाइम गोलंदाजांचे वर्चस्व-


या मालिकेत श्रीलंकेच्या पार्ट टाइम गोलंदाजांनी वर्चस्व गाजवल्याचे दिसले. श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाच्या नावावर 61 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकुण 11 बळी आहेत, त्यापैकी 6 विकेट्स या मालिकेतील आहेत. विशेषत: भारतीय मधल्या फळीतील फलंदाज श्रीलंकेच्या पार्ट-टाइमर गोलंदाजांसमोर वाईटरित्या झुंजत आहेत.


5. टीम इंडियाला चौथ्या फिरकीपटूची उणीव-


आतापर्यंत पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे श्रीलंका संघ 5 फिरकी गोलंदाजी पर्यायांसह खेळत असला तरी भारतीय संघ रियान परागपेक्षा शिवम दुबेला महत्त्व देत आहे. त्यामुळे टीम इंडियाला चौथ्या फिरकीपटूची उणीव जाणवत आहे.


संबंधित बातमी:


IND vs SL: टीम इंडियाचा पराभव होताच गौतम गंभीरचा चेहरा पडला; रिॲक्शन सोशल मीडियावर व्हायरल