India vs Sri Lanka 2nd Test : बंगळुरु येथे सुरु असलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताच्या फलंदाजीनंतर श्रीलंकेची फलंदाजाही ढासळली. कसोटीच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघाचे मिळून 16 गडी तंबूत परतले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 59.1 षटकांत सर्वबाद 252 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल खेळणाऱ्या श्रीलंका संघाची सुरुवातही खराब झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंका संघाने 30 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 86 धावा केल्या आहेत. भारताकडून श्रेयस अय्यरने एकाकी झुंज देत 92 धावांची खेळी केली. तर श्रीलंकेकडून एँजलो मॅथ्यूजने 43 धावांची खेळी केली.
भारताचा डाव –
दिवसरात्र कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयांक अग्रवाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांना भारताला चांगली सुरुवात देता आली नाही. मयांक अग्रवाल धावबाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही लगेच माघारी परतला. मयांकने चार तर रोहित शर्माने 15 धावा केल्या. हनुमा विहारी आणि विराट कोहली ही जोडी जमेल असे वाटत असतानाही पुन्हा एकदा लंकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारताला लागोपाठ धक्के दिले. हनुमा विहारी 31 तर विराट कोहली 23 धावा करुन माघारी परतले. लागोपाठ विकेट पडत असताना मैदानावर आलेल्या ऋषभ पंत याने विस्फोटक फलंदाजी केली. मात्र, पंतनेही विकेट फेकली. पंत 26 चेंडूत 39 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या जाडेजा आणि अश्विन यांनाही आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. जाडेजा 4 तर अश्विन 15 धावांवर माघारी परतले. अक्षर पटेललाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. अक्षर पटेल 9 धावा काढून बाद झाला. श्रीलंकेकडून लसिथ एम्बुल्डेनिया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. धनंजया डी सिल्वा याने दोन फलंदाजांना बाद केले तर सुरंगा लकमल याने एक विकेट घेतली.
श्रीलंकेचा डाव –
भारतीय संघाला 252 धावांत बाद केल्यानंतर प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाची फलंदाजीही ढासळली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. एँजलो मॅथ्युजचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. मॅथ्युजने 43 धावांची खेळी केली. दिमुथ करुणारत्ने 4, लाहिरू थिरिमाने 8, कुसल मेंडिस 2, धनंजया डी सिल्वा 10 आणि चरिथ असलंका 5 यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. निरोशन डिकवेला 13 आणि लसिथ एम्बुल्डेनिया शून्य धावसंख्येवर नाबाद आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शामीला दोन तर अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.
विराटकडून पुन्हा निराशा -
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या गृहमैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कारकीर्दीतील ‘शतकदुष्काळ’ संपवेल अशी क्रिकेटचाहत्यांना आशा होती. मात्र, विराट कोहलीने पुन्हा एकदा निराशा केली. चांगल्या सुरुवातीनंतर विराट कोहली बाद झाला. विराट कोहली बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा विराट कोहलीच्या शतकांची चर्चा सुरु झाली आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
भारत :
मयंक अग्रवाल, रोहित शर्मा (कर्णधार), हनुमा विहारी, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
श्रीलंका -
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो, प्रवीण जयविक्रमा