India vs Sri Lanka 2nd Test : बंगळुरु येथे सुरु असलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव 252 धावांत संपुष्टात आला आहे. श्रेय्यस अय्यरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फंलदाजी करता आली नाही. श्रेयस अय्यरने 98 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान अय्यरने चार षटकार आणि दहा चौकार लगावले. श्रेयस अय्यर वगळता एकाही फलंदाजाला श्रीलंकेच्या गोलंदाजापुढे टिकाव धरता आला नाही. हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांनी छोटेखानी खेळी केली. मात्र, त्यांना मोठी खेळी करण्यात अपश आले. पंतने 39 तर हनुमा विहारीने 31 धावांची खेळी केली.

Continues below advertisement


दिवसरात्र कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयांक अग्रवाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांना भारताला चांगली सुरुवात देता आली नाही. मयांक अग्रवाल धावबाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही लगेच माघारी परतला. मयांकने चार तर रोहित शर्माने 15 धावा केल्या. हनुमा विहारी आणि विराट कोहली ही जोडी जमेल असे वाटत असतानाही पुन्हा एकदा लंकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारताला लागोपाठ धक्के दिले. हनुमा विहारी 31 तर विराट कोहली 23 धावा करुन माघारी परतले. लागोपाठ विकेट पडत असताना मैदानावर आलेल्या ऋषभ पंत याने विस्फोटक फलंदाजी केली. मात्र, पंतनेही विकेट फेकली. पंत 26 चेंडूत 39 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या जाडेजा आणि अश्विन यांनाही आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. जाडेजा 4 तर अश्विन 15 धावांवर माघारी परतले.   अक्षर पटेललाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. अक्षर पटेल 9 धावा काढून बाद झाला.


रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या गृहमैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कारकीर्दीतील ‘शतकदुष्काळ’ संपवेल अशी क्रिकेटचाहत्यांना आशा होती. मात्र, विराट कोहलीने पुन्हा एकदा निराशा केली. चांगल्या सुरुवातीनंतर विराट कोहली बाद झाला. विराट कोहली बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा विराट कोहलीच्या शतकांची चर्चा सुरु झाली आहे.


भारताचा कसोटी संघ:
मयंक अग्रवाल, रोहित शर्मा (कर्णधार), हनुमा विहारी, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.


श्रीलंकेचा कसोटी संघ - 
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो, प्रवीण जयविक्रमा