India vs South Africa: भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सध्या चार सामन्यांची टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा टी-20 सामना काल खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला. तिसऱ्या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. 


प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 6 विकेट्स गमावून 219 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 7 विकेट्स गमावून 208 धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जॅन्सनने 17 चेंडूत 54 धावांची शानदार खेळी केली, पण तो आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 5 षटकार मारले. याशिवाय हेनरिक क्लासेनने 22 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले.


अक्षर पटेलच्या झेल अन् सामना फिरला-


हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 16 वे षटक टाकत होता. हार्दिक पांड्याने षटकातील पाचवा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने टाकला. यावर दक्षिण अफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने जोरदार चेंडू टोलावत सीमारेषेबाहेर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमारेषेजवळ अक्षर पटेल क्षेत्ररक्षण करत होता. वेळेवर उडी मारत अक्षर पटेलने झेल पकडला आणि डेव्हिड मिलरला माघारी धाडले. डेव्हिड मिलरला बाद करणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे डेव्हिड मिलर बाद होताच हा सामना भारताच्या दिशेने झुकल्याचे पाहायला मिळाले. 


अक्षर पटेलचा अप्रितम झेल, Video:






मार्को जॅन्सन आणि हेनरिक क्लासेनची झंझावाती खेळी-


भारताच्या 219 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का 27 धावांवर बसला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रायन रिक्लेटन 15 चेंडूत 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर, रीझा हेन्रिक्सने 13 चेंडूत 21 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने 18 चेंडूत 29 धावांची खेळी केली. ट्रिस्टन स्टब्स 12 चेंडूत 12 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. यानंतर हेनरिक क्लासेनने 22 चेंडूत 41 धावा केल्या. हेन्रिक क्लासेनला अर्शदीप सिंगने बाद केले.


अर्शदीप सिंग सर्वात यशस्वी गोलंदाज-


भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे तर अर्शदीप सिंग हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अर्शदीप सिंगने 4 षटकांत 37 धावांत 3 फलंदाज बाद केले. वरुण चक्रवर्तीने 2 विकेट्स पटकावल्या. याशिवाय हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या.


तिलक वर्मा आणि अभिषेक शर्माची आक्रमक खेळी-


तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 219 धावा केल्या. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक धावा केल्या. तिलक वर्मा 56 चेंडूत 107 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार मारले. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने 25 चेंडूत 50 धावा केल्या.


संबंधित बातमी:


Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली