मँचेस्टर : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सामन्याकडे अवघ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे. टीम इंडिया दमदार कामगिरीच्या जोरावर गुणतालिकेत नंबर वनवर आहे तर न्यूझीलंड चौथ्या स्थानी आहे. आज सेमीफायनल जिंकून फायनल गाठण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने क्रिकेटप्रेमींची निराशा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


या आधी भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा 13 जून रोजी असलेला  साखळी सामना देखील  पावसामुळे रद्द झाला होता. हा सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघाला एक-एक गुण  दिला होता.

आज देखील मँचेस्टरच्या या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पावसाची जास्त शक्यता आहे.  ब्रिटिश हवामान विभागाच्या मते आज दिवसभर इथे ढग व्यापून राहणार आहेत. संध्याकाळच्या वेळेस पावसाची शक्यता देखील विभागाने व्यक्त केली आहे. मँचेस्टरमध्ये आजचे तापमान  20 डिग्री पर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे. तर  20-30 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.



Ind Vs NZ उपान्त्य फेरीवर पावसाचं वर्चस्व राहिल्यास सामन्यावर काय परिणाम?
टीम इंडियाने विश्वचषकाच्या साखळी फेरीत सर्वोत्तम कामगिरी बजावून गुणतालिकेत अव्वल क्रमांक पटकावला आहे आता उपान्त्य फेरीत टीम इंडियाचा सामना आज न्यूझीलंडशी होणार आहे. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे. या सामन्यात जर पावसाचा खेळ झाला, तर निकालावर काय परिणाम होईल, हा प्रश्न काही जणांना पडला आहे.

भारताचे बिनीचे फलंदाज आणि न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजामधलं द्वंद्व हे या सामन्याचं मुख्य आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. भारताला रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल या तीन फलंदाजांकडून पुन्हा धावांची अपेक्षा राहील, तर न्यूझीलंडची मदार लॉकी फर्ग्युसन, ट्रेण्ट बोल्ट आणि मॅट हेन्री या तीन वेगवान गोलंदाजांवर राहील. मात्र या सामन्यात पावसाचं वर्चस्व राहिलं, तर काय होईल?

पावसात आजचा सामना पूर्णपणे धुवून निघाला, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तो खेळवला जाईल. त्यासाठीच उपान्त्य फेरीमधील दोन सामन्यांमध्ये राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे. इंग्लंडमधील स्थानिक हवामान विभागाच्या अनुमानानुसार बुधवारच्या दिवसावरही पावसाचं सावट आहे. जर त्या दिवशीही पाऊस पडला, तर भारत थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. कारण गुणतालिकेत भारताला न्यूझीलंडपेक्षा अधिक गुण आहेत.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधला दुसरा उपान्त्य सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे. त्यानंतर, रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीपूर्वीही मध्ये दोन दिवसांची वेळ राखून ठेवण्यात आली आहे. साखळी फेरीमध्ये सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास दोन्ही संघांना एक-एक गुण बहाल केले जात होते. मात्र उपान्त्य फेरीत राखीव दिवसाचा पर्याय आहे.

सामना सुरु झाल्यानंतर पावसाला झाली, किंवा ठराविक वेळेत पाऊस थांबला, तर डकवर्थ ल्युईस पद्धती लागू होईल. त्यानुसार एका किंवा दोन्ही संघांना 50 षटकं फलंदाजीसाठी दिली जाणार नाहीत.

विशेष म्हणजे साखळी फेरीतील भारत आणि न्यूझीलंड यांच्या सामन्यातच पाऊस झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आले होते. म्हणूनच हे दोन संघ भिडल्यावर कोणाचं वर्चस्व राहील, याबाबत केवळ कागदी ठोकताळे बांधले जात आहेत.

नऊ सामन्यांमध्ये 15 गुण मिळवत भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द होऊन भारताला एकच गुण मिळाला, तर इंग्लंडकडून पराभवाचा धक्का बसल्याने भारताचे दोन गुण गेले होते. ऑस्ट्रेलियाने भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांकडून पराभव स्वीकारत 14 गुणांची कमाई केली आणि दुसरं स्थान पटकावलं. तीन सामन्यात पराभूत झालेला इंग्लंड 12 गुणांसह तिसऱ्या, तर न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.