India vs New Zealand World Cup 2023 : टेबलटॉपरसाठी आज भारत आणि न्यूझीलंडचे संघ धर्मशालाच्या मैदानात आमनेसामने असतील. न्यूझीलंडची स्विंग आणि वेगवान गोलंदाजीचा तोड भारताकडे आहे. त्यातच टीम इंडिया लयीत आहे. हार्दिक पांड्यामुळे बॅलेन्स थोडाफार बिघडलाय, पण त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी भारताकडे तीन शस्त्रे आहेत. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. या तिन्ही फलंदाजांना न्यूझीलंडची गोलंदाजी फोडण्याची कला अवगत आहे. आजच्याही सामन्यात रोहित-विराट अन् गिल धावांचा पाऊस पाडतील, असाच अंदाज आहे.
न्यूझीलंडविरोधात कोहलीचा शानदार रेकॉर्ड -
विश्वचषकात विराट कोहली लयीत आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून आतापर्यंत दोन अर्धशतके आणि एक शतक निघाले आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरोधात अर्धशतके ठोकली आहेत. तर बांगलादेशविरोधात शतक मारले आहे. विराट कोहलीची लय पाहता न्यूझीलंडची गोलंदाजीही तो फोडून काढेल. आतापर्यंत न्यूझीलंडविरोधात कोहलीने धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने न्यूझीलंडविरोधात 29 सामन्यात 1433 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान पाच शतके आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. आजही कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
न्यूझीलंडविरोधात शुभमन गिलचे द्विशतक -
विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यात उपलब्ध नसलेल्या गिलने दमदार कमबॅक केले. पाकिस्तानविरोधात चांगली सुरुवात मिळाली होती. तर बांगलादेशविरोधात अर्धशतक ठोकले होते. शुभमन गिल याचे न्यूझीलंडविरोधातील रेकॉर्डही जबराट आहे. शुभमन गिल याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना द्विशतकही ठोकले आहे. शुभमन गिल याने आतापर्यंत न्यूझीलंडविरोदात आठ सामन्यात 484 धावा आहेत. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकांचा समावेश आहे. शुभमन गिल याने जानेवारी 2023 मध्ये न्यूझीलंडविरोधात 208 धावांची खेळी केली होती.
रोहितचाही दमदार कामगिरी -
भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या शानदार लयीत आहे. पहिल्या चेंडूपासूनच रोहित शर्मा प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडतो. रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात टॉपवर आहे. दिल्लीमध्ये अफगाणिस्तानविरोधात शतक ठोकले होते. तर पाकिस्तानविरोधात 86 धावा चोपल्या आहेत. बांगलादेशविरोधातही 48 धावांचे योगदान दिले होते. आता रोहित शर्मा न्यूझीलंडची गोलंदाजी फोडण्यास तयार झाला आहे. न्यूझीलंडविरोधात रोहित शर्माने 27 वनडे सामन्यात 889 धावा चोपल्या आहेत. त्यामध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. आजही रोहित शर्माकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल.
आणखी वाचा :
World Cup 2023: धरमशालामध्ये भारत-न्यूझीलंडमध्ये लढत, खेळपट्टी, प्लेईंग 11 बद्दल जाणून घ्या