India vs Bangladesh T20: बीसीसीआयने बांगलादेशविरुद्ध (Ind vs Ban) 6 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेमधील पहिला टी-20 सामना 6 ऑक्टोबरला, दुसरा सामना 9 ऑक्टोबरला आणि मालिकेतील शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला होणार आहे.


पुन्हा सूर्यकुमार यादवकडे टीम इंडियाचे टी-20 फॉरमॅटचे नेतृत्व देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मालिकेत (Ind vs Ban) दोन खेळाडू पदार्पण करणार आहेत. यामध्ये मयंक यादव आणि नितीश रेड्डी या वेगवान गोलंदाजांना समावेश आहे. तर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला तब्बल तीन वर्षांनी संधी मिळाली आहे. 2021 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला. 3 वर्षानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करत आहे. 


कोणाला मिळाली संधी?


गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची धुरा हाती घेतल्यानंतर संघात महत्वाचे बदल दिसून येत आहे. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांना यष्टिरक्षक म्हणून ठेवण्यात आले आहे. संजू सॅमसन यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दोन्ही सामन्यात शून्य धावांवर बाद झाला होता. आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळलेल्या मयंक यादवलाही पदार्पणाची संधी मिळाली आहे. आयपीएलच्या नुकत्याच झालेल्या हंगामात मयंक यादवने ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करून खळबळ उडवून दिली होती. अभिषेक शर्माला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही, पण त्याआधी त्याने झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावून टीम इंडियात धमाकेदार एन्ट्री केली. हर्षित राणा, अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील, तर भारतीय संघाकडे शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी आणि हार्दिक पांड्या यांच्या रूपाने 3 वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू असतील.


निवड समितीने सर्वांनाच चकीत केले-


150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयंकला भारतीय संघात घेत निवड समितीने सर्वांनाच चकीत केले. मयंकने आयपीएलमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आयपीएलच्या मध्यंतरी मयंक पोटाखालील स्नायू दुखावल्याने स्पर्धेबाहेर झाला होता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाच महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.






टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ: 


सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, रियन पराग, नितीश रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा , मयंक यादव.


संबंधित बातमी:


जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याच्या तयारीत; कोणत्या संघासोबत सुरु आहे चर्चा?