दाम्बुला : श्रीलंकेत सुरु असलेल्या महिला आशिया कप स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतानं बांगलादेशला (IND W vs BAN W) पराभूत केलं आहे. भारतानं बांगलादेशवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारत आता महिला आशिया कप जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतापुढं विजयासाठी 81 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यामध्ये रेणुका सिंग आणि राधा यादवनं घेतलेल्या प्रत्येकी तीन विकेट महत्त्वाच्या ठरल्या. भारताच्या सलामीवीर स्मृती मानधाना आणि शफाली वर्मा यांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.  भारतानं बांगलादेशला 10 विकेटनं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि शफाली वर्मा (Shafali Varma) या दोघींनी भारताला 10 विकेट राखून विजय मिळवून दिला. स्मृती मानधनानं अर्धशतक केलं आणि तिला शफाली वर्मानं साथ दिली. स्मृती मानधनानं नाबाद 55  आणि शफाली वर्मानं नाबाद 26 धावा केल्या.


बांगलादेशनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बांगलादेशच्या फलंदाजांना दमदार कामगिरी करता आली नाही. भारताच्या गोलंदाजीपुढं त्यांचा टिकाव लागला नाही. रेणुका सिंग ठाकूर आणि राधा यादव या दोघींनी प्रत्येकी तीन विकेट घेत बांगलादेशला रोखलं. भारताचा संघ 20 ओव्हरमध्ये 8 विकेटमध्ये 80 धावा करु शकला. 


बांगलादेशला रेणुका सिंगनं पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का दिला. दिलारा अख्तरला 6  धावांवर रेणुकानं बाद केलं. बांगलादेशची एकावेळी 6  बाद  44  धावा अशी स्थिती झाली होती. मात्र, कॅप्टन निगर सुल्ताना आणि शोर्ना अख्तर यांनी 36 धावांची भागिदारी केल्यानं बांगलादेशला समाधानकारक धावसंख्या उभारता आली. बांगलादेशची कॅप्टन निगर सुल्ताना हिनं 32 धावा केल्या. तर, शोर्ना अख्तरनं 19  धावा केल्या.  बांगलादेशच्या इतर फलंदाजांना चांगल्या धावा करता आल्या नाहीत.


भारत आठव्यांदा विजेतेपद मिळवणार? 


महिला आशिया कप स्पर्धा सुरुवातीला एकदिवसीय क्रिकेटच्या स्वरुपात खेळवली जात होती. काही वर्षांपासून ही स्पर्धा टी 20  प्रकारात खेळवली जात आहे. भारतानं एकदिवसीय आणि टी 20 असं दोन्ही मिळून  7 वेळा विजेतेपद मिळवलं आहे. आता भारतीय संघाला आठव्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. भारतानं बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीच्या लढतीत जो संघ विजयी होईल तो अंतिम फेरीत भारताविरुद्ध लढणार आहे. 


भारताचा संघ : शफाली वर्मा, स्मृती मानधना, उमा छेत्री, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर,  राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका सिंग ठाकूर



बांगलादेशचा संघ : दिलारा अख्तर, मुर्शिदा खातून, निगार सुल्ताना, रुमाना अहमद, इश्मा तंझीम,रितू मोनी, राबेया खान, शोर्ना अख्तर,  नाहिदा अख्तर, जहांआरा आलम, मारुफा अख्तर


संबंधित बातम्या :


IND W vs BAN W : बांगलादेशचा निर्णय चुकला, भारताच्या लेकींनी फायदा उठवला, उपांत्य फेरीत दमदार कामगिरी


Asia Cup : महिला आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील लढती ठरल्या, भारताविरुद्ध कुणाचं आव्हानं, विजेतेपदापासून दोन पावलं दूर