India vs Bangladesh: कानपूर येथे खेळवण्यात येणाऱ्या भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 146 धावांवर सर्वबाद झाला. कसोटी मालिकेतील पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये बांगलादेशचा संघ ढेपाळला. भारतीय संघाला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी 95 धावांचं आव्हान असणार आहे. दुसरा कसोटी सामना जिंकल्यास टीम इंडिया 2-0 अशा फरकाने मालिका जिंकेल.
भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बीसीबीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला सामना पाहण्यासाठी आले होते. राजीव शुक्ला सामना पाहतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राजीव शुक्ला काहीतरी खाताना दिसत आहेत आणि त्यानंतर कॅमेऱ्याचे लक्ष त्यांच्याकडे जाते आणि ते सावध होतात. तसेच यादरम्यान समोरुन जाणाऱ्या एका तरुणाला देखील काहीतरी रागाने बोलताना राजीव शुक्ला या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
बांगलादेशचा दुसरा डाव कसा राहिला?
बांगलादेशने दुसऱ्या डावात 10 विकेट्स गमावत 146 धावा केल्या. भारताकडून दुसऱ्या डावात जडेजा, अश्विन आणि बुमराह यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. बांगलादेशने पाचव्या दिवसाची सुरुवात 26/2 धावांवर केली. संघाने तिसरी विकेट लवकर गमावली. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी शादमान इस्लाम आणि नजमुल हुसेन शांतो यांनी 55 (84) धावांची भागीदारी करून संघाला मजबूत केले आणि शादमान आणि शांतो यांच्यातील भागीदारी संपताच बांगलादेश मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते. परंतु दोघांनाही मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आले. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या मोनीमूल हक दुसऱ्या डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मोनीमूल हकने 8 चेंडूत फक्त 2 धावा केल्या. तर झाकीर हुसैनने 10, हसन महमूदने 4, कर्णधार नजमूल शांतोने 19, लिटन दासने 1, मेहंदी हसनने 9, मुस्तफिझूर रहीमने 37 धावा केल्या.
भारताचा पहिला डाव कसा होता?
भारतीय संघाने सर्वांत वेगवान 50, 100 आणि 200 धावांचा विक्रम नोंदविला.भारताकडून यशस्वी जैस्वाल (72) आणि केएल राहुल (68) यांनी अर्धशतके झळकावली. विराट कोहली 47 धावा करून शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 27 हजार धावाही पूर्ण केल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने 4 आणि मेहदी हसन मिराजने 3 विकेट घेतल्या.