(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS | दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय, मालिकेत 2-0 अशी आघाडी
IND vs AUS | हार्दिक पांड्याच्या 22 चेंडूतील 42 धावांच्या निर्णायक खेळीमुळे भारताने दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. या विजयासोबत भारताने टी20 मालिका जिंकली आहे.
IND vs AUS: भारताने सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेंट्सनी पराभव केला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका घशात घातली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 195 धावांच आव्हान भारतानं दोन चेंडू बाकी राखत पार केलं. धडाकेबाज खेळी करुन भारताला विजय प्राप्त करुन देणाऱ्या हार्दिक पांड्याला 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार मिळाला.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार फिंच आजच्या सामन्यात खेळला नाही. त्याच्याऐवजी मॅथ्यू वेडने संघाची जबाबदारी सांभाळली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 195 धावांच लक्ष ठेवलं होतं. कर्णधार मॅथ्यू वेडने 32 चेंडूत 58 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यात 10 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. भारताकडून टी. नटराजन याने 2 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीसाठी आलेल्या केएल राहुल आणि शिखर धवनने भारताची सुरुवात सावधपणे केली. त्यानंतर केएल राहुल 30 धावा करुन माघारी परतला. त्याच्या जागी आलेल्या विराट कोहलीने संयमाने फलंदाजी करताना धावसंख्या हालती ठेवली. शिखर धवन 52 आणि विराट कोहली 40 धावा केल्यानंतर बाद झाले. त्यानंतर हार्दिक पांड्याने श्रेयस अय्यरच्या मदतीने लक्ष पार केलं.
हार्दिक पांड्याने धडाकेबाज खेळी करत विजयी षटकार हाणला. त्याने 22 चेंडूत 42 धावा करताना 3 चौकार आणि 2 षटकार मारले. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा टीम इंडियाने टी20 मालिका जिंकून घेतला आहे.