(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS 2nd ODI | टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान
ऑस्ट्रेलियाने वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे.
राजकोट : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला दुसरा वन डे सामना आज (17 जानेवारी) राजकोटमध्ये खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने त्या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. मुंबईतील पहिल्या वनडे सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघासमोरील आव्हान वाढलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीमुळे यजमान संघाची दुबळी बाजू समोर आली होती. आता विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असेल. भारताने हा सामनाही गमावला तर ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेवर ताबा मिळवेल. वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारताला ना मोठी धावसंख्या करु दिली, ना एकही विकेट दिली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांसारखे गोलंदाज असतानाही डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिन्च यांची सलामीची जोडी सहजरित्या धावा करत राहिली आणि भारतील गोलंदाजांना विकेटसाठी शेवटपर्यंत ताटकळत ठेवलं. राजकोटमध्ये कोहलीसमोर सर्वात मोठं आव्हान फलंदाजीचा क्रम आहे. मधल्या आणि शेवटच्या फळीची अडचण अद्यापही कायम आहे. सोबतच रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यापैकी सलामीला कोण येणार याबाबतची डोकेदुखीही आहे. या सगळ्या अडचणींवर मात करुन टीम इंडियाला आजच्या सामन्यात विजय मिळवण्याचं आव्हान पूर्ण करायचं आहे. संभाव्य संघ भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मनीष पांडे, लोकेश राहुल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिन्च (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, अॅश्टन अगर, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, जोश हेजलवूड, मार्नस लाबुशॅन, केन रिचर्डसन, डी आर्की शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा
संबंधित बातम्या
INDvsAUS | टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 10 विकेट्सने धुव्वा
IND vs AUS : वानखेडेवर कांगारुंकडून अनेक विक्रमांची नोंद, भारताच्या नावे लाजिरवाने रेकॉर्ड्स