India U19 vs New Zealand U19 : अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवा ब्रिगेडचा विजयरथ सुरुच आहे. सुपर 6 च्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 214 धावांनी दारुण पराभव केला. भारताचा हा सलग चौथा विजय होय. मुशीर खान याचं तडाखेबाज शतक आणि सौम्य पांड्याचा भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिलाय. भारताने प्रथम फलंदाजी करताना 295 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल न्यूझीलंडचा संघ 81 धवांत गारद झाला. 


मुशीर खानच्या 131 धावा आणि सलामीवीर आदर्श सिंगच्या 52 धावांच्या झंझावती खेळीमुळे भारतीय संघाने 50 षठकात आठ गडी गमावून 295 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल न्यूझीलंडचा संघ 28.1 षटकात 81 धावांवर गारद झाला. डावखुरा फिरकीपटू सौम्य पांडे (19 धावांत 4 विकेट) आणि मुशीर (10 धावांत 2 विकेट) तसेच वेगवान गोलंदाज राज लिंबानी (17 धावांत दोन विकेट) यांनी भेदक मारा केला. 


 295 धावांचा बचाव करताना राज लिंबानीने पहिल्याच षटकात दोन जणांना तंबूत पाठवले. त्यांना खातेही उघडू दिले नाही.  टॉम जोन्स (00) आणि स्नेहित रेड्डी (00) यांना तंबूत धाडले. त्यानंतर सौम्य पांडेने लॅकलेन स्टैकपोल  (05) आणि जेम्स नेल्सन (10) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. न्यूझीलंडने 22 धावांत आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. या धक्क्यातून न्यूझीलंडचा संघ पुन्हा सावरलाच नाही. न्यूझीलंडकडून कर्णधार ऑस्कर जॅक्सनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 19 धावांची खेळी करत संघर्ष केला. न्यूझीलंडचा सघ 81 धावांत गारद झाला. अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. न्यूझीलंडचा अंडर 19 विश्वचषकातील सर्वात मोठा तिसरा पराभव आहे. त्याशिवाय तिसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्याही आहे. 


दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. खासकरुन मुशीर खान याने शानदार कामगिरी केली. मुशीर खान याने न्यूझीलंडच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. मुशीर खान याने 126 चेंडूमध्ये 131 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 3 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती, मागील सामन्यातील शतकवीर अर्शिन कुलकर्णी 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर मुशीर आणि आदर्श यांनी दुसऱ्या विकेटसाठी 77 धावा जोडल्या. आदर्शने सहा चौकारांच्या मदतीने 37 धावांचं योगदान दिलं. भारतीय कर्णधार उदय सहारन याने 35 धावा जोडल्या. भारताने अखेरच्या टप्प्यात विकेट फेकल्यामुळे 300 धावांचा टप्पा पार करता आला नाही.भारतीय संघाने 295 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून क्लार्कने चार विकेट घेतल्या.