Mayank Agarwal : कर्नाटकचा कर्णधार सलामीवीर फलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघात (Team India) पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेला क्रिकेटपटू मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आगरतळा येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसल्यानंतर मयंकला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला आगरतळा येथील स्थानिक रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानात मयंक अग्रवाल आपल्या आसनावर बसला. मात्र, विमानाने उड्डाण घेण्याआधीच त्याला अस्वस्थ वाटू लागले. 32 वर्षीय मयंकने भारतासाठी 21 कसोटी सामने खेळले आहे. सोमवारी त्याच्या नेतृत्वात कर्नाटकने त्रिपुरावर 29 धावांनी विजय मिळवला. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) च्या अधिकाऱ्याने या प्रकरणाचा अधिक तपशील न देता पीटीआयला सांगितले की, “मयंक अग्रवालला आगरतळा येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या अचानक आजारी पडण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रणजी स्पर्धेत चमकदार कामगिरी
कर्नाटकचा कर्णधार असलेला मयंक अग्रवाल हा रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. गुजरातविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 109 धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर गोव्याविरुद्ध खेळल्या गेलेल्या पुढच्या सामन्यात मयंकने 114 धावा केल्या. यानंतर त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले.
टीम इंडियात पुनरागमनासाठी प्रयत्नशील
भारताकडून प्रामुख्याने कसोटी क्रिकेट खेळणारा मयंक अग्रवाल काही काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने मार्च 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो टीम इंडियात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.
मयंकच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवर एक नजर
मयंकने भारतासाठी आतापर्यंत 21 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 36 डावांमध्ये त्याने 41.33 च्या सरासरीने 1488 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 4 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 243 धावा होती. याशिवाय एकदिवसीय सामन्यांच्या 5 डावात त्याने 86 धावा केल्या. या दरम्यान त्याला एकदिवसीय सामन्यात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. मयंकने डिसेंबर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मयंकने आयपीएलमध्येही छाप सोडली आहे. त्याने 123 आयपीएल सामन्यात 2597 धावा केल्या आहेत.