India vs Sri Lanka 1st ODI: उद्या (रविवार 18 जुलै) भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा पहिला सामना खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबोमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. या सामन्यात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन भारताकडून डेब्यू करू शकतो. वास्तविक, सॅमसनने भारताकडून टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र, अद्याप त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही.


या सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला कर्णधार शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामीला येऊ शकतात. देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड आणि नितीश राणा यांच्या रूपात टीम इंडियाकडे इतर पर्याय असले तरी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार धवन पृथ्वी शॉला सलामीची पहिली संधी देऊ शकतात.


यानंतर तिसर्‍या क्रमांकावर सूर्यकुमार यादव यांचे खेळणं निश्चित मानलं जात आहे. त्याचबरोबर विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. केरळच्या या फलंदाजाकडे बराच अनुभव आहे. त्यामुळे किमान एकदिवसीय सामन्यात त्याला इशान किशनपेक्षा प्राधान्य दिलं जाईल. संजूनंतर मनीष पांडेला पाचव्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.


पांड्या ब्रदर्स फिनिशरची भूमिका साकारणार
हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या 6 व 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. हे दोन्ही भाऊ फिनिशरची भूमिका साकारणार आहेत. श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर क्रुणाल पांड्या खूप प्रभावी ठरू शकतो. शेवटच्या षटकांत तो स्फोटक फलंदाजी देखील करू शकतो. इंग्लंडविरुद्ध होम ग्राऊंडवर एकदिवसीय मालिकेतही त्याने हे दाखवून दिले. दुसरीकडे, हार्दिक आपल्या प्रदर्शनाने समीक्षकांचे तोंड बंद करण्याची शक्यता आहे.


कुल्चाला मिळू शकते संधी
श्रीलंकेच्या खेळपट्टीवर नजर टाकल्यास कर्णधार धवन कुल्चा अर्थात युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या जोडीला पहिल्या एकदिवसीय सामन्यात संधी देऊ शकतो. जेव्हा जेव्हा ही जोडी वन-डे क्रिकेटमध्ये एकत्र खेळली आहे, तेव्हा भारताच्या विजयात यांनी मोलाचे योगदान दिल आहे. यानंतर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी उपकर्णधार भुवनेश्वर कुमार आणि वेगवान स्टार नवदीप सैनी यांच्यावर असेल. मात्र, दीपक चहर आणि चेतन सकारिया हेदेखील संघात चांगले पर्याय आहेत, पण सैनीला भुवीसह संधी दिली जाऊ शकते.


भारताचा संभाव्य इलेव्हन - शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि नवदीप सैनी.