मुंबई : भारतीय क्रिकेटर शिवम दुबेनं शुक्रवारी आपल्या मैत्रिणीबरोबर लग्न केलं आहे. त्यानं स्वत: लग्नाच्या फोटोंसह ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. भारताच्या या ऑलराऊंडर खेळाडूनं आपली मैत्रिण असलेल्या अंजुम खानसोबत मुंबईमध्ये लग्न केलं आहे. विशेष म्हणजे हे लग्न हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या परंपरेप्रमाणे पार पडलं. शिवमनं टाकलेल्या फोटोंमध्ये एका फोटोत तो दुआ मागताना दिसतोय तर दुसऱ्या एका फोटो शिवम आणि अंजुम हे दोघं एकमेकांना अंगठी घालत असताना दिसत आहेत.  


आयपीएलमधून खास करुन चर्चेत आलेल्या शिवम दुबेनं आपल्या लग्नाचे काही फोटो ट्वीट केले आहेत. त्यानं ट्वीट करत म्हटलं आहे की, आम्ही प्रेमावर प्रेम केलं… जे प्रेमापेक्षा जास्त होतं.. आता आमचं नवं आयुष्य सुरु होतं…. जस्ट मॅरिड 16-07-2021…!”, असं म्हणत त्यानं आपल्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत.  






एका ओव्हरमध्ये पाच षटकार आणि शिवम दुबे चर्चेत 
2018 साली रणजी ट्रॉफीमध्ये शिवम दुबेनं एका ओव्हरमध्ये पाच षटकार लगावले होते. शिवमनं अशी कामगिरी दोन वेळा केली. त्याआधी  टी-20 मुंबई लीगमध्ये त्यानं  प्रवीण तांबेच्या एका ओव्हरमध्ये देखील पाच षटकार ठोकले होते. रणजीमधील खेळीच्या जोरावर त्याला 2019 च्या आयपीएलमध्ये मोठी रक्कम देत विराट कोहलीच्या बंगळुरु संघानं विकत घेतलं होतं. बंगळुरुकडून शिवम दुबेनं उत्तम खेळीचं प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर 2021 पासून तो राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळत आहे. आता काही महिन्यातच यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित मॅचेसमध्ये शिवम खेळताना दिसणार आहे. 


शिवम दुबेनं भारतीय संघासाठी देखील सामने खेळले आहेत. त्याने भारताकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला. सोबतच त्यानं 13 टी ट्वेन्टी आणि एका एकदिवसीय मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी त्याला चांगली संधी मिळाली नसली तरी रणजी आणि आयपीएलमध्ये त्यानं जोरदार कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे.