मुंबई : भारतानं (India) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) सात चेंडू आणि दोन विकेट्स राखून पराभव करत अंडर नाईन्टिन विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. बेनोनीमधल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी 50 षटकांत 245 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतानं 48 षटकं आणि पाच चेंडूंमध्ये विजयासाठीचं लक्ष्य पार केलं. बीडचा सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या 171 धावांच्या भागिदारीनं भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.


त्या दोघांनी चार बाद 32 अशा केविलवाण्या परिस्थितीतून भारतीय संघाला विजयाच्या दिशेनं नेलं. सचिन धसनं 95 चेंडूंत 11 चौकार आणि एका षटकारासह ९६ धावांची खेळी उभारली. उदय सहारननं 124 चेंडूंत सहा चौकारांसह 81 धावांची खेळी केली. अंडर नाईन्टिन विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार, 11 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या दुसऱ्या उपांत्य फेरीतला विजयी संघ भारताविरुद्ध अंतिम फेरीत खेळेल.


भारताची गोलंदाजी


भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने 9 षटकात 60 धावा दिल्या. याशिवाय मुशीर खानने 2 विकेट्स घेतल्या. यादरम्यान मुशीरने 10 षटकात 43 धावा दिल्या. तर नमन तिवारी आणि सौमी पांडे यांना प्रत्येकी 1 विकेट्स घेण्यात यश मिळाले.


आफ्रिकेची खेळी 


प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात हवी होती. त्याने 5व्या षटकात 23 धावांवर पहिली विकेट गमावली. आफ्रिकेला पहिला धक्का स्टीव्ह स्टोल्कच्या रूपाने बसला, जो 17 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर 9व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर खाते न उघडता बाद झालेल्या डेव्हिड टायगरच्या रूपाने संघाने दुसरी विकेट गमावली.


सुरुवातीच्या दोन विकेट पडल्यानंतर, आफ्रिकेचा डाव रिचर्ड सेलेट्सवेन आणि लुआन-ड्रे प्रिटोरियस यांनी सांभाळला. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची (133 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी मुशीर खानने 31व्या षटकात लुआन-ड्रे प्रिटोरियसच्या विकेटसह मोडली. चांगली खेळी खेळणारा प्रिटोरियस 102 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 76 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.




ही बातमी वाचा : 


श्रेयस अय्यर संघाबाहेर? विराट कोहलीचं कमबॅक, 3 कसोटी सामन्यासाठी आज टीम इंडियाची निवड